Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आठवा दिवस; कॉंग्रेसचं 'बिग बीं'ना खास आवाहन
Wrestlers Protest : गेल्या आठ दिवसांपासून जंतरमंतरवर बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे.
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात गेल्या आठ दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेसने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. कॉंग्रेस नेते सलमान अनीस सोज (Salman Anees Soz) यांनी अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांनादेखील कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
कॉंग्रेस नेते सलमान अनीस सोज यांनी ट्वीट केलं आहे की,"प्रिय अमिताभ बच्चन, न्याय मागणाऱ्या महिला कुस्तीपटूंबद्दल तुम्हाला माहिती असेलच. तुमच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तींच्या पाठिंब्याची त्यांना गरज आहे. तुम्ही T4633 च्या माधअयमातून आवाज उठवू शकता. तुमच्यासह इतर सेलिब्रिटींचादेखील त्यांना पाठिंबा मिळायला हवा. कृपया आवाज उठवा".
Dear @SrBachchan: You must be aware of India's female wrestling champions seeking justice. They deserve support from India's most influential voices. Your T 4633 could help elevate their voices. They deserve support from you and other superstars. Please raise your voice.
— Salman Anees Soz (@SalmanSoz) April 29, 2023
आंदोलनाचा आठवा दिवस
देशातील काही दिग्गज महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी संघ्याकाळी कुस्तीपटूंची भेट घेतली. दरम्यान कुस्तीपटूंना पाठिंबा देत ते म्हणाले,"काँग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असो...तुम्हाला भारतावर प्रेम असेल तर सुट्टी घ्या आणि इथे या. त्यांना पाठिंबा द्या, ते स्वतःसाठी लढत नाहीत".
बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले,"बृजभूषण शरण सिंहविरोधात एफआयआर नोंदवायला सात दिवस लागले आहेत. जर या मुलींनी संघर्ष केला नसता तर त्यांच्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या".
बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयआर
भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दुसरीकडे अटक होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे.
संबंधित बातम्या