Childrens Day Special : व्यावसायिक नाटकांना मिळणारा मान सन्मान बालनाट्याच्या वाटेला येत नाही; बालदिनी बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार यांची खंत
Raju Tulalwar : नाटक ही जादुई, अदभुत गोष्ट आहे. रंगमंचाबद्दलची ओढ, प्रेम बालरंगभूमीवर काम करण्यास प्रेरणा देते, असं बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार म्हणाले.
Raju Tulalwar On Balnatya : बालप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न बालनाट्य करत असतात. गेल्या काही दिवसांत बालरंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार (Raju Tulalwar) बालदिनानिमित्त (Childrens Day 2022) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"बालरंगभूमी' मोठी मंडळी चालवत आहेत. ती हळू हळू लहान मुलांच्या ताब्यात द्यायला हवी. बालरंगभूमीवर काय सादर व्हावे हा निर्णय मुलांचा हवा. मोठ्यांच्या नियंत्रणातुन बालरंगभूमी मुक्त व्हायला हवी."
राजू तुलालवार म्हणाले,"बालनाट्य दोन स्तरांवर सादर होताना दिसत आहेत. व्यवसायिक बालनाट्य आणि शालेय बालनाट्य किंवा स्पर्धात्मक बालनाट्य. व्यवसायिक बालनाट्य मनोरंजक आहेत. तर शालेय बालनाट्य समस्या मांडण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. व्यवसायिक बालनाट्य क्षेत्रात आता कॉर्पोरेट कंपन्यांनी प्रवेश केला आहे. भव्य-दिव्य बालनाट्य अधिक पैसे खर्चून बालक-पालक बघत आहेत. स्पर्धात्मक बालनाट्यां करीता बाल प्रेक्षक मिळवावा लागतो. शोधावा लागतो".
राजू तुलालवार पुढे म्हणाले,"कोरोनानंतर व्यावसायिक बालनाट्य प्रयोगांना बाल प्रेक्षक येताना दिसत आहेत. कॉर्पोरेट बालनाट्यांच्या प्रयोगांना गर्दी होत आहे. काही बालनाट्य संस्था मुलांना मोफत बालनाट्य प्रयोग दाखवत आहेत. त्यालाही पालक आणि बालकांचा प्रतिसाद लाभत आहे".
बालकलाकारांकडून काय शिकायला मिळतं?
राजू तुलालवार म्हणाले,"बालसुलभ अभिनय म्हणजे काय? ही गोष्ट बाल कलाकारांकडून शिकायला मिळते. मुलांच्या संकल्पना भन्नाट असतात. बालनाट्याचे अनेक विषय आणि पात्र योजना मुलेच सुचवतात. नाटक ही जादुई, अदभुत गोष्ट आहे. रंगमंचाबद्दलची ओढ, प्रेम बालरंगभूमीवर काम करण्यास प्रेरणा देते. गेली 42 वर्ष बालनाट्य करतोय. बालरंगभूमी हेच कर्मक्षेत्र आहे. अजून खूप काही करायचं आहे".
नाट्यगृहांवर भाष्य करताना राजू तुलालवार म्हणाले,"नाट्यगृहाकडून बालनाट्याची उपेक्षा होते. प्रौढ रंगभूमीला मिळणारा मान सन्मान बालनाट्याच्या वाटेला येत नाही.
बालनाट्य संस्थांना मागितलेल्या तारखा कधीच कुठेच मिळत नाहीत".
बालदिनाला एवढंच सांगेन...
बालदिनानिमित्त राजू तुलालवार म्हणाले,"शिक्षणाचा हक्क जसा प्रत्येक मुलाला आहे. त्याप्रमाणे 'बालनाट्य' हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. मुलांना नाटक बघायला आणि करायला ,दोन्ही आवडतं. प्रत्येक मुलाने वर्षातून एक तरी बालनाट्य करावे आणि बघावे सुद्धा. उद्याची प्रौढ रंगभूमी आजची मुले आकारास आणणार आहेत. बाल प्रेक्षक चळवळीची गरज सध्या आहे. बाल प्रेक्षक घडवावा लागेल.
संबंधित बातम्या