(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubhneet Singh : "पंजाब माझ्या रक्तात आहे"; 'त्या' पोस्टवर अखेर शुभनीत सिंहनं सोडलं मौन
शुभनीत सिंह (Shubhneet Singh) हा एका पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.आता या वादावर शुभनीतनं मौन सोडलं आहे.
Shubhneet Singh : गायक आणि रॅपर शुभनीत सिंह (Shubhneet Singh) हा त्याच्या एका पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. या पोस्टमध्ये शुभनीतनं पंजाबचा उल्लेख केला होता. या पोस्टमुळे अनेकांनी शुभनीतवर टीका केली. तसेच शुभनीत सिंहचा भारत दौरा रद्द करण्यात आला. काही सेलिब्रिटींनी अनफॉलो देखील केलं. आता या सर्व वादावर शुभनीतनं मौन सोडलं आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे.
शुभनीत सिंहची पोस्ट
शुभनीत सिंहनं इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, "पंजाबचा एक तरुण रॅपर-गायक म्हणून, माझे संगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणणे हे माझे स्वप्न होते. पण अलीकडच्या घडामोडींमुळे माझी मेहनत आणि प्रगती कमी झाली आहे. माझी निराशा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी मला काही शब्द बोलायचे होते."
भारत दौऱ्याबाबत काय म्हणाला शुभनीत सिंह?
शुभनीतचा भारत दौरा रद्द झाला. त्याबाबत त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "माझा भारत दौरा रद्द झाल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. मी माझ्या देशात, माझ्या लोकांसमोर परफॉर्म करण्यासाठी खूप उत्साही होतो. तयारी जोरात सुरू होती आणि मी गेले दोन महिने मनापासून प्रॅक्टिस करत होतो. मी खूप उत्साही, आनंदी होतो आणि परफॉर्म करण्यास तयार होतो. पण नियतीने आणखी काही योजना आखल्या होत्या."
View this post on Instagram
पुढे त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे, ज्यांनी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी, गौरवासाठी बलिदान देण्याचा क्षणाचाही विचार केला नाही. पंजाब माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. आज मी जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळे आहे. पंजाबींना देशभक्तीचा दाखला देण्याची गरज नाही. इतिहासाच्या प्रत्येक वळणावर पंजाबी लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की, प्रत्येक पंजाबीला फुटीरतावादी किंवा देशद्रोही असे नाव देण्याचे टाळावे. माझ्या इन्स्टा स्टोरीवर ती पोस्ट पुन्हा शेअर करण्याचा माझा हेतू फक्त पंजाबसाठी प्रार्थना करण्याचा होता कारण राज्यभर वीज आणि इंटरनेट बंद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामागे दुसरा कोणताही विचार नव्हता आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा नक्कीच हेतू नव्हता. माझ्यावरील आरोपांचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. पण जसे माझ्या गुरूंनी मला 'मानस की जात सबई एकाई पाचनबो' (सर्व मानव एकच म्हणून ओळखले आहे) शिकवले आहे आणि त्यांनी मला घाबरायचे नाही, हे शिकवले आहे जे पंजाबियतचे मूळ आहे. मी मेहनत करत राहीन. माझी टीम आणि मी लवकरच परत येऊ, एकत्र मोठ्या आणि मजबूत होऊ. वाहेगुरु मेहर करे सरबत दा भला"
संबंधित बातम्या: