मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलासा आहे. उच्च न्यायालयाने अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. शिवाय आजच्या (5 एप्रिल) अंधेरी कोर्टातील हजेरीबाबतही सलमानला सूट देण्यात आली आहे. कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं.


साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केलं होतं. त्याची सुनावणी आज, 5 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. या समन्समध्ये सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.


दरम्यान आपल्या बॉडीगार्डसह एका पादचाऱ्यावर हल्ला करुन त्याला धमकावल्याप्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी सलमान खानने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.


काय आहे प्रकरण?
एके दिवशी मुंबईत रस्त्यावर सायकल चालवत असताना काही जणांनी सलमानचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरुन सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात भादंवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डीएननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर महानगर दंडाधिकारी आर आर खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली. रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचं न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना समन्स जारी केलेलं आहे.


संबंधित बातम्या


Salman Khan ची हायकोर्टात धाव, डीएन नगर पोलिसात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका



Salman Khan : सलमान खान हाजीर हो... भाईजानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप