Posterboy Sachin Gurav : सिनेमाचं पोस्टर हा त्या सिनेमाचा फर्स्ट लूक असतो. त्यामुळे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सिनेमाला जायचं की नाही ते प्रेक्षक ठरवतो. तसेच त्या पोस्टवरुन तो सिनेमा चालणार की फ्लॉप होणार याचादेखील अंदाज बांधला जातो. हिंदी-मराठीसह अनेक सिनेमांचं पोस्टर बनवण्याची धुरा सचिन गुरव (Sachin Gurav) गेल्या काही वर्षांपासून सांभाळतो आहे. 


सचिनचे आजोबा जनार्दन गुरव हे प्रभातमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करायचे. त्यामुळे त्याला घरातूनच बाळकडू मिळालं. सिनेक्षेत्राची गोडी निर्माण झाल्याने त्याने विश्राम सावंत यांच्या एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. विश्राम सावंत यांच्या माध्यमातून सचिन राम गोपाल वर्मांपर्यंत पोहोचला आणि त्याच्या पोस्टर बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 'निशब्द' हा सचिनला पहिला सिनेमा. या सिनेमानंतर त्याने राम गोपाळ वर्मांच्या अनेक सिनेमांचे पोस्टर बनवले. त्यानंतर सचिनची गाडी सुसाट सुटली. 


सचिन लवकरच पार करणार 200 सिनेमांच्या पोस्टर्सचा टप्पा!


सचिनने आतापर्यंत 192 सिनेमांसाठी 192 पोस्टर बनवले आहेत. पोस्टर बनवण्याच्या प्रवासाविषयी सचिन म्हणतो,प्रत्येक सिनेमा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक सिनेमाचं पोस्टर बनवताना नव-नविन गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या सिनेमाचं पहिलं इमप्रेशन पाहून प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा की नाही ते ठरवतात. सिनेमाच्या पोस्टरला आजही खूप महत्त्व आहे. पोस्टरमध्ये लाल रंग असेल तर त्या कलाकृतीत थरार असेल. लाल रंग म्हणजे डेंजर. मग त्या सिनेमात थ्रील, अॅक्शन असेल याचा अंदाज येतो. रोमॅंटिक सिनेमाचं पोस्टर असेल तर त्या पोस्टरमध्ये गुलाबी रंगाच्या छटा असतात. विनोदी सिनेमा असेल तर पॉपी रंग वापरले जातात. डार्क झोनच्या सिनेमांत काळपट रंगाचा वापर करण्यात येतो. पोस्टर पाहिल्यानंतर त्या सिनेमाचा आवाका किती असेल याचा अंदाज येतो. त्यामुळे पोस्टर बनवताना रंगसंगती, रस या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे". 


सिनेमाचं पोस्टर बनवणं जबाबदारीचं काम 


सचिन पुढे म्हणाला, एखाद्या सिनेमाचं पोस्टर बनवणं हे जबाबदारीचं काम आहे. त्यासोबत सामाजिक भान जपणंदेखील गरजेचं आहे. खाद्या पोस्टवरुन सिनेमाला ट्रोल केलं जाऊ शकतं. सिनेमाची नाचक्की होऊ शकते. पोस्टर बनवण्याच्या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकत गेलो आहे. पोस्टरमध्ये वेगळा प्रयोग केल्यानंतर हे लोकांना आवडेल का, समजेल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. सिनेमाच्या कथानकासोबत पोस्टरमध्ये असलेला आशयदेखील महत्त्वाचा आहे".


सिनेमात असणारे व्हिज्यूअल्स पोस्टरचा भाग असतात. उदा. 'आदिपुरुष'च्या टीझरमध्ये राम समुद्राच्या एका जागेवर बसून धनुष्यबाण मारतोय. ही सेम पोझ सचिनने पोस्टरमध्ये वापरली आहे. यावर भाष्य करताना सचिन म्हणाला,"हजारो इमेजमधून आपण काय इमेज निवडतो हे महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांना काय दाखवायचं आणि त्याचं मन जिंकायचं हे आपल्या हातात आहे". 


हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेसृष्टीत सचिन काम करतो आहे. दोन्हीत जाणवणाऱ्या फरकाविषयी भाष्य करताना सचिन म्हणाला,"मराठीत काम करताना आपलेपणा जाणवतो. मराठीत आपुलकी असते. पण हिंदीत बजेट जास्त असतं. त्यामुळे कलात्मक प्रयोग करता येतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. 


सचिननं डिझाइन केलेल्या सिनेमांचे पोस्टर्स -


'टिंग्या', 'सुखांत', 'मुंबई-पुणे-मुंबई', 'रक्तचरित्र', 'प्रेमाची गोष्ट', 'झपाटलेला 2', 'दुनियादारी', '72 मैल एक प्रवास', 'क्वीन', 'अस्तु', 'किल्ला', 'एक हजाराची नोट', 'रेगे', 'एलिझाबेथ एकादशी', 'लोकमान्य', 'मितवा', 'टाइमपास 2', 'बॉम्बे वेल्वेट', 'डबल सीट', 'गुरु', 'व्हेंटिलेटर', 'बकेट लिस्ट', 'ठाकरे', 'आनंदी गोपाळ', 'धुरळा', 'झिम्मा', 'द कश्मिर फाइल्स', 'चंद्रमुखी', 'दगडी चाळ 2', 'हर हर महादेव', आगामी 'आदिपुरुष' सिनेमाचं पोस्टरदेखील सचिनने बनवलं असून अनेक सिनेमांचे पोस्टर सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.


संबंधित बातम्या


Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल


Marathi Natak : 'चारचौघी' ते 'दादा एक गुड न्यूज आहे'; वीकेंडला नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी