Amruta Khanvilkar On Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला आहे. आता या सिनेमातील अमृता खानविलकरचा लुक समोर आला आहे.
सोनाबाई देशपांडेंच्या भूमिकेत अमृता खानविलकर
अमृता खानविलकर 'हर हर महादेव' या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हर हर महादेव' हा अमृताचा पहिला ऐतिहासिक सिनेमा असुन ती पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसून येणार आहे.
अमृताचा पहिला ऐतिहासिक सिनेमा
अमृता खानविलकरचा 'हर हर महादेव' या सिनेमातील सोनाबाई देशपांडे यांचा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवारी साडीतील अमृताचा पहिला लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
अमृताने 'हर हर महादेव' या सिनेमातील आपला लुक शेअर करत लिहिलं आहे,"योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत घराचा डोलारा सांभाळणारी स्त्रीदेखील योद्धाच असते. गनिमांना कंठस्नान घालणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत अभिनेत्री अमृता खानविलकर. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार. येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून 'हर हर महादेव' मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमधून आपल्या भेटीला येणार".
कलाकारांची मांदियाळी असलेला 'हर हर महादेव'
'हर हर महादेव' या सिनेमात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सुबोध भावे, शरद केळकर ,अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 25 ऑक्टोबरला 'हर हर महादेव' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा 'हर हर महादेव' हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.
संबंधित बातम्या