मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत.


रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणात शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार यांचाच अर्ज फेटाळला आहे. तसेच रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचा जामीन मंजूर झाला आहे. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टाची प्रक्रीया सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन अर्ज मंजूर केला.


न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आपला निर्णय सुनावला. याआधी 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.


एनसीबीने 8 सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला चौकशीनंतर अटक केली होती. रात्र झाल्यामुळे रियाला 8 सप्टेंबर रोजी एनसीबीच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 9 सप्टेंबर रोजी मुंबईच्या भायखळा कारागृहात तिची रवानगी करण्यात आली होती. जवळपास 1 महिनाभर रिया चक्रवर्ती भायखळा जेलमध्ये होती.


कोर्टाने दोन वेळा रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी वाढवली होती. त्यानंतर आता रियासह, मिरांडा आणि दीपेशचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. रिया, शौविक आणि मिरांडासह 5 आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.


जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, एनसीबीने रिया आणि इतर सर्व आरोपींना जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी केली. तसेच कोर्टात सांगितलं की, रिया फक्त सुशांतपर्यंतच ड्रग्ज पोहोचवत नव्हती, तर अवैध्य ड्रग्ज ट्रॅफिकिंग आणि फायनेंसिंगमध्येही सहभागी होती.


दरम्यान, रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांवर ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी दरम्यान ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं होतं. ज्यानंतर एनसीबीच्या टीमने या प्रकरणी आपला तपास सुरु केला होता.


महत्त्वाच्या बातम्या :