मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार आपलं मन रमवण्यासाठी अनेक गोष्टी करत होते. यात कुणी स्वयंपाकघरात नवी काही शिकत होतं. तर कुणी एखाद्या कलेला आपलंसं करत होतं. या सगळ्यात सोनाली कुलकर्णी मात्र फारशी कुठे दिसली नाही. तुम्हाला आठवत असेल तर सोनालीचे फोटो दिसत होते पण काही नव्यानं करून पाहण्यात मात्र आलं नव्हतं. आता मात्र सोनाली कुलकर्णी काय करत होती हे समोर येणार आहे.
लॉकडाऊन लागला तेव्हा खरंतर सोनाली होती दुबईमध्ये. सोनाली कुलकर्णीचा नव्याने साखरपुडा झाला होता. आणि ती दुबईला गेली होती. तिकडे काही दिवसांसाठी म्हणून गेली आणि लॉकडाऊन लागला. त्यानंतर तिने तिकडचेच फोटो टाकले. पण केवळ फोटो टाकण्यावर तिने समानधान मानलेलं नाही. तर आता तिने तिकडं नक्की काय केलं हे गाण्यातून आपल्या समोर येणार आहे. सोनालीनं तिथे एक सिंगल तयार केलं आहे. त्याचे बोल आहेत तूच तुझी सोबती. सकारात्मक ऊर्जा देणारं.. प्रेरणादायी असं हे गाणं असून हे गायलंही सोनालीनेच आहे.
या गाण्याचा टीजर आज रिलीज झाला आहे. या गाण्यात सोनाली दिसतेच शिवाय दुबईतली सुंदर लोकेशन्सही दिसतात. लॉकडाऊनमुळे सगळीच मंडळी जिथे तिथे अडकून पडली होती. त्यामुळे हे गाणं चित्रित झालं आहे दुबईत. दुबईतल्याच सिनेमेटोग्राफरने ते चित्रित केलं आहे. संगीत आणि त्याचं मिक्सिंगही तिथंच झालं आहे. विशेष बाब अशी की, दुबईतलं उचं ठिकाण म्हणून ओळखला जाणारा जबैल जैस या टोकावर याचं चित्रिकरण झालं आहे. संगीत सागर पाटीलचं असून गीत गौरी सरनाईकचं आहे.
या गाण्याचा टीजर आज आला असून हे गाणं शुक्रवारी येणार आहे. हे सिंगल लोकांना आवडेल अशी आशा सोनाली व्यक्त करते. सोनालीने यापूर्वी गाण्याचा प्रयत्न कुठे केलेला नाही. त्यामुळे तिचे हे पहिलंच गाणं असेल. अर्थात हे गाणं असंही नसून ते कवितेचं अभिवाचन आहे असंही कळतं. सोनालीने लॉकडाऊनमध्ये नक्की काय केलं हे समजायला शुक्रवारची वाट पाहावी लागेल.