मुंबई: ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी (13 नोव्हेंबर) बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली. ही चौकशी सुरु असताना एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. या अटकेसंबंधी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली.


एनसीबीच्या चौकशीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अर्जुन रामपालने सांगितले की, "कोणत्याही निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे ही वाईट गोष्ट आहे. माझे या ड्रग्ज प्रकरणाशी कोणतेही देणे-घेणे नाही. परंतु या प्रकरणासंबंधी एनसीबी जे काम करत आहे ते योग्य आहे."


त्याने पुढे सांगितले की, "एनसीबी ज्या प्रकरणाशी संबंधीत तपास करत आहे त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याची खात्री एनसीबीला झाली आहे. माझ्या घरात जे औषध एनसीबीला मिळाले आहे त्याचे प्रिस्कीप्शन माझ्याकडे आहे आणि ते मी एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांकडे  सोपवली आहे. या प्रकरणासंबंधीच्या तपासाला माझे पूर्ण सहकार्य आहे."


अर्जुन रामपालला एनसीबीने बुधवारी नोटीस पाठवली होती. दक्षिण मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबीच्या झोनल कार्यालयात गुरुवारी सकाळी 11 वाजता अर्जुन रामपाल पोहोचला होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्जुन रामपालचा विदेशी मित्र पॉल गियर्डला अटक करण्यात आली आहे. त्या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रायडिसची सलग दोन दिवस चौकशी केली होती.


एनसीबीने सोमवारी अर्जुन रामपालच्या बांद्रातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले होते. त्यासंबंधी एनसीबी तपास करत आहे.


संबंधित बातम्या





महत्वाच्या बातम्या: