मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकली. तब्बल 7 तासाच्या कारवाईनंतर एनसीबीनं अर्जुन रामपालला चौकशीसाठी 11 नोव्हेंबरला हजर राहण्याचे समन्स ही दिलं आहे. तसच त्याच्या घरातलं काही सामानं ही जप्त केलं. ज्यामध्ये भारतात बंदी असलेली काही औषधे आहेत. काल बॉलिवूड मधील निर्माते आणि निर्देशक फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी कारवाई करत एनसीबीने फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना अटक केली. या आधी सुद्धा अर्जुन रामपालच नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं होतं. मात्र एनसीबी ने पहारा ठेवत आज रामपालच्या घरी धडकली.


दिपीका, सारा, श्रद्धा बॅालिवूड मधल्या या तीन सुपरस्टार अभिनेत्रींच्या चौकशीनंतर एनसीबीच्या रडारवर होते बॅालिवूडचे तीन सुपरस्टार S R A म्हणजे शाहरुख खान, रणबीर कपूर आणि अर्जुन रामपाल. एनसीबी यांची कधी ही चौकशी करु शकते अशी चर्चा होती. पण एक महीना उलटून गेल्यानंतरही यांची चौकशी नाही करण्यात आली. कारण एक संपूर्ण महीना एनसीबी बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनवर काम करत होती. आता S R A मधल्या A पर्यंत एनसीबी पोहचली आहे. वांद्रे पश्चिमच्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावर अर्जुन रामपालचं घर आहे. जिथे आज सकाळी सात वाजता एनसीबीने रेड टाकली.


बॉलिवूड इंडस्ट्री मधील ड्रग्स कनेक्शनचा छडा लावण्यासाठी एनसीबी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बॉलीवूड मधील दोन बडी नावं समोर आली आहेत. एन सी बी ने काही दिवसांपूर्वी अब्दुल वाहिद नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. ज्याने फिरोज नाडियाडवालाची पत्नी शबाना सईदला ड्रग्स पुरवल्याची कबुली दिली तर अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या भावाला एनसीबीने अटक केली होती. ज्या नंतर अर्जुन रामपालच नाव चर्चेत आलं.


अर्जुन रामपाल सिनेमांमध्ये जरी काही विशेष करू शकला नाही तरी बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्यांशी त्या जवळचे संबंध मानले जातात. त्यामुळे अर्जुन रामपालचं नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर या कलाकारांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. या आधी सुद्धा बॉलिवूड मधील काही नावं समोर आली होती. मात्र एनसीबी ने या नावांवर शिक्कामोर्तब केलं नव्हतं पण त्याच नावांमध्ये एक नाव अर्जुन रामपालचही होतं.


येणाऱ्या दिवसांमध्ये बॉलीवूडमधील अजून काही बड्या कलाकारांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांच्या चौकशीनंतर एनसीबीने एक धडा घेतला की आधी सबळ पुरावे गोळा करायचे आणि नंतर या बड्या नावांवर कारवाई करायची जेणे करून ड्रग्स प्रकरणात समोर आलेल्या सेलिब्रेटींकडे बचावाचा मार्ग राहणार नाही.