मुंबई : कोल्हापुरात शिवाजीराव गायकवाड नावानं एक तरुण काही काळ होता, तेव्हा त्याचं पुढं काय होणार आहे हे कुणालाच माहित नव्हतं. पण हा मनुष्य मेहनतीने दक्षिणेत गेला आणि तिथला सुपरडुपर स्टार झाला. तो इतका मोठा झाला की तो एक दंतकथा बनला. हाच शिवाजी गायकवाड बनला द रजनीकांत. रजनीकांतचा दबदबा.. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट झाली की त्यांचे सिनेमे आले की त्यांच्या सिनेमांच्या दिवशी पहाटेपासून शो लागू लागले. त्यांच्या कटआऊट्सना अभिषेक घातला जाऊ लागला. रजनीकांत यांची महती होतीच तशी.


रजनीकांत हे सिनेमासृष्टीला पडलेलं स्वप्न आहे असं बोललं जातं. त्यांची स्टाईल.. त्यांचा उत्साह.. त्यांचं पडद्यावरचं वावरणं आणि वास्तव जीवनात अत्यंत साधेपणाने वावरणं हे सगळं रसिकांनी स्वीकारलं. एकिकडे सिनेमातले कलाकार पडद्याबाहेरही तरुण दिसण्याचा हट्ट धरत असताना रजनीकांत यांनी मात्र आपली दोन्ही आयुष्य वेगळी ठेवली. पडद्यावर काळ्याभोर केसांचा हा स्टाईलबाज नायक वास्तव जीवनात मात्र पांढऱ्या केसांचा टक्कल पडलेला सावळा सामान्य माणूस होता. पण रसिकांनी त्याच्यावरही तितकचं प्रेम केलं. रजनीकांत यांचं जगणं तितकंच रंजक आहे. महाराष्ट्रातल्या मातीतून आलेला हा कलाकार बघता बघता मोठा झाला. त्याचा हाच जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एन लिंगासामी हे दिग्दर्शक रजनीकांत यांचा हा चित्रपट करण्याच्या प्रयत्नात आहेत.


रजनीकांत यांचा चित्रपट येणार हे बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते रजनीकांत यांची भूमिका साकारणार कोण? आता सध्या त्याचं उत्तर एकावर येऊन स्थिरावलं आहे. रजनीकांत यांच्या सिनेमात त्यांची भूमिका अभिनेता धनुष साकारणार असल्याचं वृत्त आहे. धनुष हा रजनीकांत यांचा जावईही आहे. त्यामुळे तो रजनीकांत आणि त्यांच्या कुटुंबियाना जवळून ओळखतो. शिवाय धनुषचा आपला असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. त्याला ही भूमिका देऊ करण्यावर रजनीकांत यांनीही सहमती दर्शवल्याचं बोललं जातं. पण अद्याप धनुषने मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही. सध्या धनुष दोन ते तीन सिनेमांमध्ये व्यग्र आहे. आनंद एल राय यांचा एक चित्रपटही तो करतो आहे. त्यामुळे या चित्रपटाला कधी सुरूवात होईल ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण नव्या वर्षातल्या उत्तरार्धात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल असं बोललं जातं आहे.