संजूबाबा कॅन्सरमुक्त; मित्र राज बन्सल यांचा दावा
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. परंतु, आता संजूबाबा कॅन्सरमुक्त झाला असल्याचा दावा त्याचा मित्र राज बंसल यांनी केला आहे.
मुंबई : ऑगस्ट महिन्यात एक बातमी आली आणि बॉलिवूड हादरलं. संजूबाबाला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं असून कॅन्सर अॅडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला असल्याचंही समजलं होतं. त्यानंतर अभिनेता संजय दत्त अनेकदा मुंबईतील लीलावती आणि कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठीही दाखल झाला होता. परंतु, सध्याच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजेच, सर्वांचा लाडका संजू बाबा कॅन्सरमुक्त झाला आहे.
गेल्या चार दशकांपासून संजय दत्तचा जवळचा मित्र आणि फिल्म डिस्ट्रिब्यूशन क्षेत्रातील ओळखीचं नाव असेलेल राज बंसल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना बंसल यांनी दावा केला आहे की, 'अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली असून आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.'
राज बंसल यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'संजय दत्त काल (सोमवारी) मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आपलं PET स्कॅन करण्यासाठी गेला होता. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर सांगितलं की, संजय दत्त कॅन्सरमुक्त झाला आहे. PET स्कॅन टेस्ट जगभरात कॅन्सरच्या तपासणीसाठी ओळखली जाते.'
राज बंसल पुढे बोलताना म्हणाले की, 'रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर माझं संजयसोबत बोलणं झालं होतं. मला ही गोष्ट सांगताना संजय फार आनंदी असल्याचं दिसत होतं.' संजय दत्तने बोलताना काही सांगितलं का? एबीपी न्यूजने विचारलेल्या या प्रश्नावर संजय बंसल म्हणाले की, 'डॉक्टरांच्या हवाल्याने स्वतः संजयने कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगत खूप खूश असल्याचं सांगितलं. तसेच लवकरच आपल्या आगामी चित्रपटांचं अर्धवट राहिलेलं चित्रिकरण पूर्ण करणार असल्याचंही सांगितलं. त्याने सांगितलं की, पहिल्यांदा तो 'केजीएफ'ची शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर 'शमशेरा', 'पृथ्वीराज चौहान' आणि 'भूज' या चित्रपटांचंही शूटिंग पूर्ण करणार आहे.
उल्लेखनिय गोष्ट म्हणजे, एबीपी न्यूजने या गोष्ट तपासण्यासाठी संजय दत्त यांची पत्नी मान्यता दत्त, संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्त, संजय दत्त यांची टीम आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही बातमी लिहिपर्यंत यांपैकी कोणीही संजय दत्तच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.