Kiran Bedi Biopic : देशातील पहिली महिला आयपीएस ( Indian Police Service) अधिकारी किरण बेदी (Kiran Bedi) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शौर्य, सत्य, प्रेम, ताकद आणि काही चांगले करण्याची इच्छाशक्ती आणि कृती याचा प्रवास आता चित्रपटगृहात दिसणार आहे. किरण बेदी यांच्यावर आधारीत 'बेदी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बेदी' या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशाल चावला करणार आहेत. या चित्रपटातील स्टारकास्ट बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 2025 मध्ये रिलीज होणार आहे.
किरण बेदी या आयपीएस अधिकारी असताना त्यांनी अनेक कठोर भूमिका घेतल्या. निडर, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. 1972 मध्ये त्या आयपीएस अधिकारी झालेल्या. देशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. जवळपास 35 वर्ष भारतीय पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर 2007 मध्ये निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या वेळी त्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदी कार्यरत होत्या.
सामाजिक कार्यात किरण बेदी अग्रसेर
किरण बेदी यांनी दिल्लीव्यतिरिक्त गोवा, चंदीगड आणि मिझोराममध्ये आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. अमृतसरमध्ये 9 जून 1949 रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवली होती. तिहार तुरुंगाला मॉडेल जेल बनवण्यात त्यांचे योगदान होते. त्यांनी तुरुंगात कैद्यांना धूम्रपान करण्यास बंदी घातली. विपश्यना ध्यानासाठी वर्ग घेण्यात आले. तसेच अनेक सामाजिक कार्य केले. 1994 मध्ये आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
राजकारणात प्रवेश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात 2012 मध्ये झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्या सक्रिय होत्या. अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनिष सिसोदिया यांच्यासोबत त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली होती.भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून किरण बेदी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी पाँडिचेरी या राज्याच्या उपराज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली.