Pyarelal Sharma : ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (Pyarelal Sharma) यांना राष्ट्रपतींच्या वतीने राज्य शासनामार्फत पद्म भूषण पुरस्कार प्रदान करून आज सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्री. शर्मा यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, प्यारेलाल शर्मा यांच्या पत्नी सुनीला आणि कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्यारेलाल शर्मा यांनी यावेळी केंद्र सरकारसह राज्य शासनाचे आभार मानले.
निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान
या वर्षीचा पद्म पुरस्कार प्रदान सोहळा 9 मे 2024 रोजी राष्ट्रपती भवन येथे झाला. या सोहळ्यामध्ये श्री. शर्मा उपस्थित राहू शकले नसल्याने राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते श्री. शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्यारेलाल शर्मा यांच्याबद्दल
बॉलिवूडमधील अनेक गीतांना आपल्या संगीताने अजरामर करणारी संगीत दिग्दर्शक जोडीपैकी एक असलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा अनेक दशकांपासून संगीताची सेवा करत आहेत. प्रसिद्ध बिगुल वादक पंडित रामप्रसाद शर्मा हे प्यारेलाल यांचे वडील होते. वयाच्या आठव्या वर्षापासून प्यारेलाल यांनी व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली.
प्यारेलाल शर्मा यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी 1963 ते 1998 या कालावधीत 600 हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. 1963 मधील पारसमणी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटातील गीते चांगलीच गाजली. त्यानंतर या संगीत द्वयींनी मागे वळून पाहिलेच नाही.