(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बियर प्यायल्यानंतर, नशेत मारियानं केलं अर्शद वारसीला प्रपोज, कंगाल झाल्यानंतर उचललं हे पाऊल
Arshad Warsi Maria Goretti Love Story: अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया यांचं लग्न दोन वेळा झालं, एकदा ख्रिश्चन पद्धतीने तर दुसऱ्यांना मुस्लिम पद्धतीने.
मुंबई: अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि मारिया गोरेटी यांची लव्हस्टोरी बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. प्रेमात माणूस धर्म, जात, संस्कृती आणि इतर सर्व गोष्टींना बाजूला सारतो, अर्शद आणि मारियाची प्रेमकहाणीही अशीच आहे. दारुच्या नशेत अर्शदची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड आणि सध्याची पत्नी मारिया गोरेटीने (Maria Goretti) त्याला प्रपोज केलं होतं.
अर्शद वारसी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक, 'सर्किट' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अर्शद वारसीने 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रशंसा मिळवली. त्याची ही भूमिका त्याने आजपर्यंत साकारलेली सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. एका उत्तम अभिनेत्यासोबतच 54 वर्षांचा अर्शद एक पूर्ण फॅमिली मॅन आहे. बी-टाऊनमध्ये तो त्याच्या डाउन टू अर्थ स्वभावासाठीही ओळखला जातो.
आई-वडिलांच्या निधनानंतर अर्शदला शिक्षण घेता आलं नाही. त्यानंतर त्याने कॉस्मेटिक सेल्समनपासून फोटो लॅबपर्यंत अनेक ठिकाणी काम केले. अर्शदने त्याचे सुरुवातीचे दिवस अत्यंत गरिबीत काढले. अर्शदला डान्सची आवड होती, तसेच मारिया गोरेटीलाही डान्सची आवड होती. आणि याच डान्सच्या आवडीने या दोघांना एकत्र आणलं हे विशेष.
अर्शद जेव्हा मारियाला पहिल्यांदा भेटला...
अर्शद वारसीला 1991 मध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये डान्स टॅलेंट शोचा जज म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. अर्शदने स्टेजवर एक सुंदर मुलीला पाहिलं आणि तिच्या प्रेमात तो वेडा झाला. ती मुलगी होती मारिया गोरेटी. हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हतं, तर अर्शद तिच्या टॅलेंटनं प्रभावित झाला होता. नंतर त्याने मारियाला त्याच्या डान्स ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले, परंतु तिने अर्शदची ऑफर नाकारली.
मारियाचा अर्शदला नकार
मारियाने नकार दिल्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ते दोघे पुन्हा भेटले. यावेळी मारिया अर्शदच्या डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्यास तयार झाली. हळूहळू दोघींची मैत्री झाली आणि एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या. अर्शदने त्याचं मारियावर असलेलं प्रेम व्यक्त केलं पण मारियाने त्याला नकार दिला.
कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळली बिअर
एका मुलाखतीमध्ये अर्शदने त्याच्या या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं.
अर्शदने सांगितलं की, एकदा तो मारियासोबत दुबई टूरवर गेला होता. तेव्हा त्याने मारियाच्या कोल्ड ड्रिंकमध्ये बिअर मिसळली होती. मारिया दारूच्या नशेत होती आणि तिने अर्शदसमोर प्रेमाची कबुली दिली. अर्शदवर ती खूप प्रेम करत असल्याचं तिनं सांगितलं.
'व्हॅलेंटाईन डे'ला लग्न
अर्शद आणि मारिया यांनी दोनदा लग्न केलं. कारण मारिया ख्रिश्चन होती तर अर्शद मुस्लिम कुटुंबातील होता. अशा स्थितीत मारियाच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीचे लग्न चर्चमध्ये, पूर्ण ख्रिश्चन रितीरिवाजांनी व्हावं. तर अर्शदच्या कुटुंबीयांना निकाह हवा होता. म्हणून या जोडप्याने 14 फेब्रुवारी 1999 रोजी व्हॅलेंटाईन डेला लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचे पारंपारिक पद्धतीने लग्न झालं.
मारियाने संघर्षाच्या काळात साथ दिली
अर्शद वारसीने 1996 मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी अर्शदचा अभिनय लोकांना आवडला. मात्र पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला खूप संघर्ष करावा लागला. अशा स्थितीत त्याला बरेच दिवस काम मिळाले नाही. त्यांच्या आयुष्यात अशी वेळ आली जेव्हा तो तीन वर्षे घरी बसून कामाच्या शोधात भटकत राहिला. या कठीण काळात त्यांची पत्नी मारियाने त्याला खंबीरपणे साथ दिली आणि तीन वर्षे घरचा खर्च उचलला. नंतर अर्शदची गाडी पुन्हा रुळावर आली आणि तो यशस्वी झाला.