Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सोशल मीडियाद्वारे चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्या ट्रोलर्सबद्दल आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. बॉयकॉट ट्रेंड संपवण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. अर्जुन कपूर म्हणाला की, 'मला वाटतं आपण त्याबद्दल गप्प राहून चूक केली आणि लोकांनी त्याचाच गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे.'


अर्जुन कपूरने 2012 मध्ये परिणीती चोप्रासोबत 'इशकजादे' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले. त्याची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. अर्जुन शेवट तारा सुतारिया, दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns)  या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. अलीकडेच, अभिनेत्याने चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.


ट्रोलर्सवर भडकला अर्जुन कपूर


सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ‘बॉयकॉट’ अर्थात बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु आहे. मोठ्या प्रमाणात बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट केले जात आहे. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर देखील होताना दिसत आहे. यावर बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, 'आपण सर्वांनी याबाबत शांत राहून चूक केली आहे. यावर शांत राहून प्रत्येकजण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत काम करत होता, त्याचाच गैरफायदा घेऊ लागले आहेत. इंडस्ट्रीतील लोकांना वाटते की, त्यांचे काम त्यांच्यासाठी बोलेल. मात्र, आता ट्रोल करणाऱ्यांना याची सवय लागली आहे.’


आम्ही खूप चिखलफेक सहन केली!


पुढे तो म्हणाला की, ‘इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे. कारण लोक त्यांच्याबद्दल काय लिहितात किंवा ते ज्या हॅशटॅगचा ट्रेंड करतात ते वास्तवापासून वेगळे असतात. जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. अभिनेत्यांच्या आडनावांमुळे चित्रपटांवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. लोक सतत चिखल फेक करत राहिले, तर नवीन गाडीचीही चमक थोडी कमी होईल, नाही का? आम्ही तर खूप चिखलाचा सामना केला आहे. पण, तरीही आम्ही त्याकडे डोळेझाक केली आहे.’


अर्जुन नुकताच मोहित सूरीच्या 'एक व्हिलन 2' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील होते. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल होता. याशिवाय अर्जुन कपूर लवकरच आकाश भारद्वाजच्या ‘अनटोल्ड’ आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर'मध्ये झळकणार आहे.


हेही वाचा :


Ranveer Singh Bold Photos : विनाकारण ट्रोल करू नका; रणवीर भावाला 'व्हिलन'चा सपोर्ट


Arjun Kapoor : अर्जुननं वांद्रे येथील फ्लॅट विकला; इतक्या कोटींमध्ये झाली डील