Laal Singh Chaddha : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. मंगळवारी सुट्ट्या संपल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कमालीची घट झाली. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करावे लागल्याचेही समोर आले आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची ही अवस्था पाहून लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून बाहेर पडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.


बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांमध्ये आमिरच्या या चित्रपटाचा समावेश होणार आहे. कलेक्शनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ‘लाल सिंह चड्ढा’ची अवस्था ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’पेक्षाही वाईट झाली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मंगळवारी जवळपास 85 टक्क्यांची घसरण झाली आहे. चित्रपटाचे 70 टक्के शो रद्द करण्यात आले आहेत. या अहवालानुसार, मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या सहाव्या दिवशी ‘लाल सिंह चड्ढा’ने 2 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे.


एकूण कमाई किती?


सोमवारपर्यंत या चित्रपटाने 45.83 कोटींची कमाई केली होती. त्यात, मंगळवारच्या कलेक्शनची भर घातली, तर सहा दिवसांचे एकूण कलेक्शन अवघे 47 ते 48 कोटी होईल. अशा परिस्थितीत चित्रपटाकडून फारशा अपेक्षा उरलेल्या नाहीत. ‘लाल सिंह चड्ढा’ची पहिल्या आठवड्यातील कमाई अद्याप 50 कोटींच्या जवळपासही पोहोचलेली नाही.


मोठ्या कलाकारांची फौज


‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टुडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत, तर काही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आमिरसोबतच या चित्रपटात करीना कपूर, मनो सिंह, नागा चैतन्य या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


जागतिक बॉक्स ऑफिसवरही आपटला चित्रपट!


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला विरोध होत असताना, प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्यासारखे अनेक गंभीर आरोपही या चित्रपटावर करण्यात आले आहेत. या सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होताना दिसत आहे. केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर, आमिर खानच्या या चित्रपटाची वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवरही खूपच कमी कमाई होत आहे.


वाचा इतर बातम्या: