मुंबई : चित्रपट आणि खेळांचं जुनं नातं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत. जर एखाद्या खेळाडूवर चित्रपट येत असेल तर प्रेक्षकांमध्येही उत्साह दिसून येतो. असाच एक चित्रपट येऊ घातला आहे. महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर चित्रपट येत आहे. या चित्रपटात झूलनची भूमिका कोण साकारणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. झूलनची भूमिका साकरण्यासाठी एका अभिनेत्रीचं नाव चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे.
सध्या मीडियामध्ये अनुष्का शर्मा झूलन गोस्वामीचा बायोपिक करणार असल्याच्या चर्चां सुरू आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने चित्रपट झिरोनंतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. असं म्हटलं जात आहे की, झूलन गोस्वामीवरील बायोपिकमध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत दिसू शकते. दरम्यान, अद्याप याबाबत अनुष्का शर्माने कोणतीही माहिती दिलेली नाही.
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेन्ड असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडूंवर बायोपिक तयार करण्यात येत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येत असून त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
झूलनबाबत बोलायचे झाले तर, झूलन गोस्वामीने 2002मध्ये डेब्यू केला होता. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. त्याचबरोबर भारतीय महिला संघाची स्टार गोलंदाज आहे. झूलनने दहा टेस्ट मॅचमध्ये 40 विकेट्स घेतले आहेत. तर वनडेमध्ये तिने 225 विकेट्स आपल्या नावे केले आहेत. झूलनने टी-20 मध्ये अनेक रेकॉर्ड केले असून तिने 68 सामन्यांमध्ये 56 विकेट्स घेतले आहेत.
संबंधित बातम्या :
दीपिकाची जेएनयूमध्ये उपस्थिती, धास्तावलेल्या कंपन्यांनी दोन आठवड्यांसाठी जाहिराती थांबवल्या
Shikara Trailer: काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा 'शिकारा'चा ट्रेलर रिलीज
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज; विंग कमांडरच्या भूमिकेत दिसणार अजय देवगन
अखेर 'गुल मकई'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; नोबेल विजेती मलालाचा जीवनपट उलगडणारा चित्रपट