मुंबई : लोकसंगीताचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना थिरकायला भाग पाडणारे गायक आनंद शिंदे आता नव्या अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्होरक्या या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी ते पहिल्यांदाच मराठी रॅप गाताना दिसणार आहेत. या गाण्याचा टिझर आला असून उद्या, सोमवारी हे संपूर्ण गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे.


या गाण्याविषयी बोलताना आनंद शिंदे म्हणाले की, हे अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. मी लोकगीतं, भीमगीतं आणि अनेक गाणी गायली. हे गाणं लोकगीत असताना देखील वेगळं काहीतरी या गाण्यातून मिळत आहे. या गाण्यातून वेगळा आनंद मला मिळाला आहे. हा मान मला मिळाला आहे याबद्दल मी म्होरक्या टीमचा आभारी आहे. पोपटापासून आतापर्यंत प्रेम दिलं  तसंच या गाण्यालाही द्या असं आवाहन आनंद शिंदे यांनी केलं आहे. कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी हे गीत लिहिलं आहे तर संगीत वैभव शिरोळे यांचं आहे.



हेही वाचा-  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य

बार्शी सारख्या ग्रामीण भागातील अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेला म्होरक्या हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.

गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा म्होरक्या हा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले होते यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला होता.