मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जानेवारी 2021 मध्ये आई-बाबा बनणार आहेत. लॉकडाऊन असो वा प्रेग्नन्सी अनुष्काने स्वत:ला फिट ठेवलं. त्यामुळे ती प्रेग्नन्सीदरम्यान शूटिंग करत होती. केवळ चित्रीकरणच नाही तर अनुष्का प्रेग्नन्सीमध्ये योगासनंही करत आहे. अनुष्काने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विराटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात गर्भवती अनुष्का विराटच्या मदतीने शीर्षासन करताना दिसत आहे.
या फोटो पोस्ट करताना अनुष्काने लिहिलं आहे की, "हा व्यायाम सर्वात कठीण होता. जुना फोटो. योगासनं माझ्या आयु्ष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला होता की, प्रेग्नन्सीमध्येही मला सर्व योगासनं करायला हवी. मात्र वाकणारी किंवा वळणारी योगासनं वगळता इतर आसनं मदतीने करता येऊ शकतात. शीर्षासन जे मी अनेक वर्षांपासून करत आहे, त्यासाठी मी भिंत आणि पतीच्या मदतीने तोल सांभाळून केलं जेणेकरुन अतिरिक्त सुरक्षा मिळावी. हे आसनही योग शिक्षकांच्या देखरेखीतच केलं, जे ऑनलाईन सेशनद्वारे माझ्यासोबत होते. प्रेग्नन्सीमध्येही मी माझी प्रॅक्टिस सुरु ठेवू शकले याचा मला आनंद आहे."
एकीकडे विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून अनुष्का शर्मा मुंबईत शूटिंग पूर्ण करत आहे. अॅडिलेडमध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी अनुष्का शर्मासोबत उपस्थित राहण्यासाठी विराटने कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने त्याची पॅटर्निटी लीव्ह मंजूर केली आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील अखेरचा सामना 2 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे भारताने आधीच ही मालिकाही गमावली आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. त्यानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.