मुंबई : गेल्या ५ नोव्हेंबरपासून राज्य सरकारने सिनेमागृहं आणि नाट्यगृह खुली करण्याची परवानगी दिली आहे. 50 टक्के प्रेक्षकसंख्येचा नियम घालून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रात काही सिनेमे थिएटरवर धडकले आहेत. सध्या काही नवे आणि बरेच जुने सिनेमे पुन्हा एकदा थिएटरवर आले असले तरी राज्यातल्या तमाम थिएटरवाल्यांना प्रतीक्षा आहे ती गर्दीखेचू सिनेमांची. त्यामुळे राज्यातल्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनी आपआपल्या थिएटर्सची डागडुजी केली असली तरी अजून त्यांनी ही थिएटर्स सुरू केलेली नाहीत.
सध्या मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे लागल्याचं चित्र आहे. इथे लागलेल्या चित्रपटांत आवर्जून उल्लेख करायला हवा तो सूरज पे मंगल भारी, मुळशी पॅटर्न, हिरकणी, फत्तेशिकस्त, तुझे मेरी कसम आदी चित्रपटांचा. शिवाय आता टेनेट हा चित्रपटही थिएटरमध्ये येण्यासाठी तयार झाला आहे. डिसेंबरमध्ये शकीला, इंदू की जवानी हे नवे कोरे चित्रपट थिएटरवर झळकणार आहेत. तर मराठी चित्रपटांतही वाजवुया बॅंडबाजा हा चित्रपट थिएटरमध्ये येतो आहे. तर नव्या वर्षात 7 जानेवारी 2021 मध्ये डार्लिंग हा चित्रपट रिलीज होतो आहे. नव्या वर्षात डार्लिंगचा अपवाद वगळला तर अद्याप कुणीही आपल्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. खरंतर जवळपास 40 पेक्षा जास्त चित्रपट आता प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. पण सिंगल स्क्रीन्स पुरती न उघडल्याने निर्मात्यांना हवा तो कॉन्फिडन्स येत नसल्याचं चित्र आहे.
याबद्दल बोलताना मराठी चित्रपटाचे वितरक अंकित चंदरामानी म्हणाले, 'आपल्याकडे काही सिनेमे रिलीज झाले. पण हे चित्रपट मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठीचे आहेत. येत्या काळात रिलीज होणाऱ्या चित्रपटांतही त्या प्रेक्षकांसाठी बनणारे चित्रपटच जास्त आहेत. पण सिंगल स्क्रीन्सच्या मालकांना मास साठीचे म्हणजे गर्दी खेचणारे चित्रपट हवेत. ते जोवर येत नाहीत तोवर थांबून राहण्याचा विचार ही मंडळी करताना दिसतात. मास म्हणजे गर्दी खेचणाऱ्या हिंदी चित्रपटात आवर्जून उल्लेख करायला हवा तो सूर्यवंशी आणि 83 या चित्रपटांचा. एकदा त्यांचं सिनेमामध्ये येणं झालं की सगळ्या गोष्टी स्वच्छ होतील.'
मराठी चित्रपटांचे वितरक सादिक चितळीकर यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. ते म्हणाले, 'अनेक मल्टिप्लेक्स हे मॉल्समध्ये असतात. त्यामुळे मॉलमध्ये येणारा प्रेक्षक त्यांना मिळतो. खरेदी करणारा, फिरायला येणारा.. सिनेमा पाहणारा असा वर्ग त्यात असतो. पण सिंगल स्क्रीन्सचं तसं नसतं. तिथे सिनेमाचा आनंद घ्यायलाच लोक येतात. मग त्यांना थिेएटरमध्ये आणण्यासाठी तसा सिनेमा हवा. त्या सिनेमाची वाट सध्या एकपडदा सिनेमागृहं पाहाताहेत. चांगले मोठे सिनेमे आले तर लोकही थिएटरमध्ये यायला बाहेर पडतील. सूर्यवंशी, 83 या सिनेमांमध्ये ते घडवून आणण्याची ताकद आहे. राज्य सरकारने आदेश काढल्यानंतर सर्वच थिएटरवाल्यांनी थिएटरची डागडुजी केली आहे. पण सध्याचे सिनेमे पाहता फार प्रेक्षक नसतात. त्यापेक्षा आणखी थोडी वाट पाहिली जातेय. गेल्या आठेक महिन्यांपासून नाहीतरी व्यावसाय थांबला आहे. तर आणखी थोडं थांबू असा त्यांचा मानस दिसतो.'
सध्या लॉकडाऊनमुळे खीळ बसलेल्या मराठी चित्रपटांची संख्या जवळपास 40 च्या घरात जाते. सगळ्यांनाच चित्रपट प्रदर्शित करायचे आहेत. पण हे नेमके कधी आणि कसे रिलीज करायचे याबद्दल साशंकता आहे. मधल्या काळात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याच्या बातम्यांनीही इंडस्ट्री धास्तावली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर पुन्हा एकदा इंडस्ट्री नव्याने नियोजन करू लागली आहे.