Annu Kapoor : भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) अनेकदा त्यांच्या हटके पात्रांमुळे किंवा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते अन्नू कपूर नुकतेच ऑनलाईन फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. या सायबर फ्रॉडमध्ये त्यांना तब्बल 4.36 लाखांचा गंडा घातला गेला आहे. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत त्यांना फसवण्यात आले आहे.


भामट्याने अभिनेते अन्नू कपूर यांच्या अकाऊंटमधून तब्बल 4.36 लाखांची रक्कम दुसऱ्या अकाऊंटमध्ये वळती केली आहे. एका आघाडीच्या खाजगी बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करत केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने अन्नू कपूर यांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे अन्नू कपूर यांना एकूण रकमेतून 3.8 लाख रुपये परत मिळणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.


बँक कर्मचारी असल्याचे सांगत लुटले पैसे


मुंबातील ओशिवरा पोलीस ठाण्यात या सबंधित तक्रार नोंदवण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती देताना सांगितले की, गुरुवारी एका व्यक्तीने कपूरला फोन केला आणि त्याने अन्नू कपूर यांना सांगितले की, त्यांचे केवायसी (नो युवर कस्टमर) तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने अन्नू कपूर यांना त्यांचे बँक खाते तपशील आणि वन टाईम पासवर्ड (OTP) शेअर करण्यास सांगितले, जे त्यांनी केले. मात्र, ओटीपी देताच त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले.


अन्नू कपूर यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण बँक कर्मचारी असल्याचे त्यांना सांगितले. तो अन्नू कपूर यांना म्हणाला की, त्यांच्या अकाऊंटमध्ये तातडीने केवायसी अपडेट करायची आहे. यानंतर अन्नू कपूर यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवत, आपले बँक तपशील आणि वन टाईम पासवर्ड त्या व्यक्तीसोबत शेअर केला. काही वेळाने अन्नू कपूरच्या खात्यातून भलत्याच दोन खात्यांमध्ये तब्बल 4.36 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. मात्र, बँकेने त्यांना तात्काळ फोन करून त्यांच्या खात्यावर इतके मोठे व्यवहार होत असल्याची कल्पना दिली.


पोलिसांची तत्काळ कारवाई


यानंतर अन्नू कपूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस आणि बँकेशी संपर्क साधला, त्यानंतर ज्या खात्यांमध्ये त्यांचे पैसे गेले होते त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अन्नू कपूर यांचे पैसे ज्या 2 खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते, ती दोन्ही खाती बँकेने तात्काळ फ्रीज केली असून, अन्नू कपूर यांना 3.08 लाख रुपये परत मिळणार आहेत, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.


हेही वाचा :


Annu Kapoor : 'मी शाहरुख, सलमान नाही, कामासाठी मला आजही संघर्ष करावा लागतो'; अन्नू कपूर यांचं वक्तव्य चर्चेत


'हे लोक म्हणजे दोन रोट्या देऊन 20 फोटो काढणार'; नवाजुद्दीन पाठोपाठ अन्नू कपूर यांनीही कलाकारांना फटकारलं