मुंबई : कोरोना काळात गरजवंतांना मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे आले. अनेकांनी मदत केली. हिंदी कलाकारही त्याला अपवाद नव्हते. यातले अनेक लोक अत्यंत प्रमाणिकपणे मदत करताना दिसतायत. तर काही लोक अचानक समोर येऊन गरजवंतांना मदत देताना दिसतात. त्याच्या यथासांग बातम्या होतायत. अशा लोकांना अभिनेते अन्नू कपूर यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनेही जे कलाकार मालदिवला जाऊन चित्रिकरण करतात त्यांना फैलावर घेतलं होतं. 


अन्नू कपूर यांनी एका बॉलिवूडशी संबंधित वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा समोर आणला आहे. ते म्हणातात, आपल्याकडे अलिकडे मदत करण्याचं फॅड आलं आहे. अनेक कलाकार मदत करताना दिसतायत. पण त्यांचं म्हणजे दोन रोट्या देतात आणि 20 फोटो काढतात. खरंतर मदत देणार असााल तर उजव्या हाताने दिलेली मदत डाव्या हाताला कळता कामा नये. पण प्रसिद्धी आणि सतत चर्चेत राहण्याचा अट्टाहास इतका बळावला आहे की कुठे थांबायचं ते कळत नाही. यात प्रामाणिक मदत करणारेही आहेत. काही लोक कुवत असूनही मदत करताना दिसत नाहीत. पण जे मदत करत नाहीत त्यांच्यावर आपण नको बोलूया. त्यांच्या काही अडचणी असतील. वयाचा मुद्दाही असावा त्यांच्या. पण जे मदत करतायत. सातत्याने काम करतायत त्यांना पाठिंबा दिला तरी ते खूप होईल. 


व्हाईट हाऊस! दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरातील Inside  Photos 


अन्नू कपूर यांनी या मुलाखतीत परदेशी जाऊन इन्स्टाग्रामवर आपले तोकड्या कपड्यातले फोटो टाकणाऱ्या कलाकारांनीही फटाकारलं आहे. ते म्हणतात,  तुमचे पैसे आहेत, तुम्ही श्रीमंत आहात तर खुशाल तुम्हाला हवं तिथे जा. पण तिथे जाऊन तुम्ही जी चैन करताहात त्याचं प्रदर्शन करू नका. हे असे फोटो टाकणं म्हणजे, भुकेल्या माणसासमोर आपण पक्वान्नाची थाळी घेऊन बसण्यासारखं आहे. आम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमच्याकडे पैसे खूप आहेत. तुम्ही खूप छान दिसता. तुमचं शरीरही तितकंच सुडौल आहे. पण हे सगळं करायची ही वेळ नाहीय हे लक्षात घ्यायला हवं. ' काही दिवसांपूर्वी अनू कपूर यांनी याबद्दल ट्विटही केलं होतं. याची खूप चर्चा झाली होती. कलाकारांना दोष देतानांच त्यांनी इन्स्टावर अशा पोस्ट चवीने पाहणाऱ्या नेटकऱ्यांचेही कान पिळले आहेत. हे कलाकार आपले बिकिनीतले फोटो टाकतात कारण तुम्ही ते चवीने पाहता. त्यांना लाईक करता. टाळी ही दोन्ही हाताने वाजते. या त्यांच्या फोटो टाकण्याला हे लोकही तितकेच जबाबदार आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. 


काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दिकीनेही कलाकारांच्या फोटो पोस्टबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भारतातली स्थिती.. इथे होणाऱ्या दुर्दैवी घटना पाहता कलाकारांनी त्याची थोडीतरी लाज बाळगावी अशा शब्दात नवाजने कलाकारांना फटकारलं होत.