Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. बॉलिवूडमध्ये महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत. त्यातील 'गांधी' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अगदी ऑस्करपर्यंत या चित्रपटाची चर्चा झाली. महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले असले तरी, महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यात केवळ एकच हिंदी चित्रपट पाहिला होता. महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी भारतात चित्रपटसृष्टीचा उदय होत होता. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत काही राजकीय निर्णय घेत होते, त्याच वेळी भारतात पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला होता.
स्वातंत्र हेच एकमेव ध्येय समोर ठेवून पुढे जाणाऱ्या महात्मा गांधींना चित्रपटांची फारशी आवड नव्हती. अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्यांना चित्रपटांचे सामर्थ्य आणि त्याचा समाजावर व सामान्य जनमानसावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी पटवून देण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांचे चित्रपटांबाबतचे मत बदलले नाही.
आयुष्यभरात पाहिले केवळ 2 चित्रपट
महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केवळ दोनच चित्रपट पाहिले होते. ‘मिशन टू मॉस्को’ हा पहिला चित्रपट होता, तर, दुसरा चित्रपट होता ‘राम राज्य’ (Ram Rajya). 1944मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याचा उल्लेख उद्योगपती शांतीकुमार मोरारजी यांनी त्यांच्या चरित्रात केला आहे. बापूजींच्या शिष्या मीराबेन यांनी बापूंना चित्रपट पाहण्यासाठी मनधरणी केली होती.
रामायणाच्या कथेवर आधारित होता राम राज्य
गांधींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव हिंदी चित्रपट म्हणजे 'राम राज्य'. हा चित्रपट 1943 साली प्रदर्शित झाला होता. याच काळात महात्मा गांधी भारतातील ‘रामराज्या’बद्दल बोलत होते आणि दिग्दर्शक विजय भट्ट यांनी त्यांच्यापासूनच प्रभावित होऊन ‘राम राज्य’ हा चित्रपट बनवला होता. 1944मध्ये खास महात्मा गांधींना दाखवण्यासाठी 'राम राज्य' चित्रपटाची निवड करण्यात आली होती. जुहूमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला होता. अनेक निर्मात्यांना आशा होती की, या चित्रपटानंतर त्यांचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, पण तसे झाले नाही. या चित्रपटात रामायणाची कथा असल्याने महात्मा गांधी यांनी हा चित्रपट पाहिला होता.
‘राम राज्य’हा चित्रपट रामायणाच्या कथेवर आधारित होता. प्रेम आदिब आणि शोभना समर्थ हे कलाकार भगवान राम आणि माता सीतेच्या भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. इतकेच नाही, तर अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. महात्मा गांधींना देखील हा चित्रपट आवडला होता.
हेही वाचा :
Mahatma Gandhi : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह... या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'