Anant Ambani Radhika Merchant Wedding : अंबानी कुटुंबात सध्या लग्न सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याच्या लग्नाची तयारी सुरू आहे. अनंत अंबानी स्वत: महत्त्वाच्या पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण देत आहेत. ग्रँड प्री-वेडिंग फंक्शननंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant ) यांच्या विवाह सोहळ्याआधी आणखी एक मोठा कार्यक्रम पार पडणार आहे.  


काय आहे हा मोठा कार्यक्रम?


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचा सोहळा मुंबईत तीन दिवस चालणार आहे. मात्र, त्याआधी अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.  या सामूहिक विवाह सोहळ्यात वंचित घटकातील जोडप्यांचे लग्न पार पडणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या काही दिवस आधी अंबानी कुटुंबाकडून हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 


पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात होणार कार्यक्रम


अंबानी कुटुंबाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याचे एक पत्रिका समोर आली आहे. यानुसार, हा सामूहिक विवाह सोहळा अनंत-राधिकाच्या ग्रँड प्री-वेडिंग सोहळ्याचा एक भाग आहे. हा सामूहिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील  वाडा तालुक्यात  मंगळवारी 2 जुलै रोजी पार पडणार आहे. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी हे सहकुटुंब उपस्थित असणार आहे.




तीन दिवस सुरू असणार अनंत-राधिकाचा विवाह सोहळा


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. 12 जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. 


13 आणि 14 जुलै रोजी सोहळा...


यानंतर  13 जुलै रोजी  शुभ आशिर्वाद कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. 


ग्रँड प्री-वेडिंग फंक्शन...


अनंत अंबनी आणि राधिका मर्चंट यांनी मागील वर्षी  साखरपुडा केला होता. तर मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड ते राजकारण-उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अनंत आणि राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन 29 मे ते 2 जून दरम्यान क्रूझवर झाले. या सोहळ्यातही अनेक दिग्गज उपस्थित होते. या दोन ग्रँड सोहळ्यानंतर आता अनंत-राधिका विवाह बंधनात अडकणार आहेत. 


इतर संबंधित बातम्या: