मुंबई : लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.


तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीवर अजय देवगण चित्रपट बनवणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. चित्रपटात चिनी सैनिकांशी लढा देणाऱ्या भारताच्या 20 जवानांचं बलिदान आणि शौर्य दाखवलं जाईल. चित्रपटाली कलाकारही अजून निश्चित झालेले नाहीत."





15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर 40 पेक्षा जास्त चिनी जवानांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या घटनेला 20 दिवस उलटून गेल्यानंतरही चिनी सरकारने अद्याप आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा समोर ठेवलेला नाही. 1975 नंतर पहिल्यांदाच अशी हिंसक झटापट झाली आहे.


या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग एल एलपी संयुक्तरित्या करणार आहे. गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित या सिनेमा अजय देवगण स्वत: अभिनय करणार का? किंवा या सिनेमात आणखी कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


अजय देवगणकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, अभिनेता आणि निर्माता अजय देवगण कायमच वीरगाथा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. अजय देवगणने यापूर्वी 'एलओसी : करगिल', 'द लीजेंड ऑफ भगत सिंह', 'तान्हाजी:, 'सिंघम' आणि 'रेड' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांचा धीराने आणि नेटाने सामना करणाऱ्या 20 भारतीय सैनिकांच्या बलिदान आणि शौर्याची कहाणी लोकांसमोर आणणार आहे.


अजय देवगण लवकरच 'भुजः द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एमी विर्क, प्रणिता सुभाष, शरद केळकर यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. अभिषेक दुधैया हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक आहे.