मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन झालं असून त्या 72 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गुरु नानक रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सरोज खान यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता.


सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट यां अभिनेत्रींसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना डान्स शिकवला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास 2 हजारांहून अधिक गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. कोरिओग्राफी करण्याआधी 50च्या दशकात सरोज खान बँकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. 1974मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'गीता मेरा नाम'मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी बॉविवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना डान्स करायला शिकवलं.


पाहा व्हिडीओ : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन



सरोज खान यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. ज्यामध्ये मिस्टर इंडिया, चांदनी, तेजाब, बेटा, देवदास यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सरोज खान यांनी माधुरी दीक्षितचं सर्वात लोकप्रिय झालेलं गाणं 'धक धक करने लगा' हेदेखील कोरिओग्राफ केलं होतं. बेटा चित्रपटातील या गाण्यानंतर माधुरी दीक्षितला चाहते धक धक गर्ल म्हणून ओळखू लागले.



'कलंक' चित्रपटातील गाजलेलं गाणं 'तबाह हो गए में' हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. यामध्येही माधुरी दीक्षित परफॉर्म करताना दिसून आली होती. याव्यतिरिक्त त्यांनी याच चित्रपटासाठी आलिया भट्टलाही डान्स शिकवला होता.



चित्रपट 'मिस्टर इंडिया' मधील श्रीदेवी यांच्यावर दिग्दर्शित केलेलं सर्वात लोकप्रिय गाणं 'हवा हवाई' हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.



1991मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट 'थानेदार'मधील लोकप्रिय गाणं 'तम्मा तम्मा दे दे' हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. हे गाणं आजही प्रेक्षकांना तेवढचं आवडतं.



शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय स्टारर चित्रपट देवदास यामधील गाणीही सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली होती.



महत्त्वाच्या बातम्या : 


बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन