आग्रा : अभिनेता संजय दत्तच्या सुरक्षारक्षकांनी आग्र्यात पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली. संजय दत्तच्या 'भूमी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला.

संजय दत्तच्या 'भूमी' या चित्रपटाचं शूटिंग सध्या आग्र्यात सुरु आहे. 'ताजमहल' परिसरात चित्रपटाची शूटिंग सुरु असताना चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्याचंच वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार तिथे पोहोचले. त्यावेळी संजय दत्तच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप पाच पत्रकारांनी केला आहे.

सुरक्षारक्षकांच्या मारहाणीत छाती आणि डोक्याला दुखापत झाल्याचं एक पत्रकाराने सांगितलं. तसंच कॅमेरा तोडण्याचा आणि चॅनलचे माईक हिसकावल्याचा आरोपही संजय दत्तच्या सुरक्षरक्षकांवर करण्यात आला आहे.

याप्रकरणी ताज गंज पोलिस ठाण्यात संजय दत्तच्या सुरक्षारक्षकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, गोंधळामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं.

गोंधळ अधिक वाढल्याने संजय दत्त पुढे आला. दिग्दर्शक उमंग कुमार आणि संजय दत्तने पत्रकारांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. त्यानंतर गोंधळ कमी झाला.