मुंबई : टाळेबंदीत अडकलेल्या लोकांना घरी पोहचवणं असो, शेतीसाठी अवजारांची मदत किंवा मग वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, अगदी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल लागणार असेल तर एक नाव तत्काळ समोर येतं अभिनेता सोनू सूद. या कामामुळे सोनूला नेटकऱ्यांनी 'ब्रदर ऑफ द नेशन'ची उपाधी दिलीय. हे सर्व करताना त्याला आनंद वाटत असला तरी एका गोष्टीचं शल्य नेहमी त्याला टोचत असल्याचे सोनूने सांगितले.
सोशल मीडियाचा आतापर्यंत फक्त कोण काय करतंय? कोण कुठं चाललंय यासाठीचं वापर होत होता. मात्र, मला पहिल्यांदाच सोशल मीडियाची ताकद समजली. मी सोशल मीडियावरुन सर्वसामान्यांशी बोलायला लागलो. तेव्हा मला त्यांचे प्रश्न, अडचणी समजल्या अन् सोशल मीडियाची खरी ताकद कळली. त्यातूनचं मी लोकांची मदत करण्यास सुरुवात केल्याचे सोनूने सांगितले.
लोकांना पायी चालताना पाहिलं, त्यावेळी मी त्यांना जेवण पुरवत होतो. त्या काळात मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना म्हटलं की, मी तुम्हाला घरी सोडतो. बस मधून घरी जाताना माझ्या आभारासाठी ते हात करायचे, त्यावेळी माझे कुटुंबीय गावी जात असल्याचा भास होत होता. ही लोकं घरी पोहचल्यानंतर मला फोटो पाठवायचे, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त वाटला.
सोनू सूदला चाहत्याची अनोखी मागणी; सोनूचं मजेशीर उत्तर
लोकांची पायपीट पाहताना ज्या घटना समोर आल्या. त्या मनाला हेलावून टाकणाऱ्या होत्या. त्यातूनचं त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. या मदतीदरम्यान लोकांचा जो विश्वास निर्माण तो मला जास्त महत्वाचा आहे. माझ्याकडे नियमित दोनशेच्या आसपास मॅसेज, दोन हजारच्या आसपास ईमेल येतात. माझं कुटुंब आणि टीम हे सर्व तपासून मग आम्ही ठरवतो की कोणाला मदत करायची.
माझी आई कॉलेजमध्ये प्राध्यापक होती. तिने नेहमीच गरजवंताला मदत करण्याची प्रेरणा दिली. वडिलांचं पंजाबमध्ये कपड्याचं दुकान होतं. त्या दुकानासमोर छोटसं लंगर लावत होतो. सध्या माझे आई-वडील नाहीय. मात्र, त्यांची शिकवण नेहमीच माझ्या सोबत आहे. माझी पत्नीदेखील मला नेहमी हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देते.
कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी
मी सर्वांची मदत करु शकत नाही, याचं दुःख : सोनू
मी सर्वांची मदत करु शकत नाही, याचं दुःख वाटतं. मात्र, सर्वांपर्यंत वेळेत मदत पोहचवण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझ्या मदतीने लोकांची कामं पूर्ण होतात, तो आनंद माझ्यासाठी सर्वात जास्त आहे. तुम्ही कोणतंही काम करताना हे गृहीत धरुन चलायचं की तुमच्या कामावर लोक बोलणारचं. मात्र, त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम करतचं राहिलं पाहिजे, अशी संदेशही सोनू सूदने दिला. चेन्नईमध्ये पहिल्यांदा तमिळ चित्रपटात मला पहिल्यांदा ब्रेक मिळाला. मात्र, सुरुवातीपासून हे क्षेत्र अवघड असल्याचा अनुभव आला. त्यावेळी काम करत राहिलो आणि हे यश मिळाले, असल्याचे त्याने सांगितले.