वयाच्या साठीत आमीर खानला गवसलं पुन्हा प्रेम; रीना, किरणसोबतच्या नात्यांवर म्हणाला, माझी लग्नं टिकली नसली, तरी...
नुकतंच आमीर आपल्या लव्ह लाइफबद्दल आणि पूर्व पत्नींबरोबर असलेल्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोललाय.

Aamir Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Amir Khan) प्रेमाच्या बाबतीत कायमच नशीबवान ठरला असला, तरी त्याचं वैवाहिक आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं राहिलंय. पहिली पत्नी रीना दत्त(Rina Dutt) आणि नंतर किरण राव (Kiran Rao) दोन्हींसोबतचे विवाह तुटले, पण नात्यांची ऊब मात्र हातातून निसटली नाही. दोघींशी झालेल्या घटस्फोटानंतरही आमिरच्या आयुष्यात गौरी स्प्रॅटची एन्ट्री झाली आणि आपल्या 60व्या वाढदिवशी त्यानं गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यानं सांगितलं.नुकतंच आमीर आपल्या लव्ह लाइफबद्दल आणि पूर्व पत्नींबरोबर असलेल्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोललाय.
‘आम्ही वेगळे झालो, पण मनाने नाही’
‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना आमिर म्हणाला,“हे दाखवतं की आपण चांगले माणूस आहोत. रीना एक जबरदस्त व्यक्ती आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे झालो, पण माणूस म्हणून नाही. तिच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. मी तिच्या सोबत मोठा झालोय.” तो पुढे म्हणाला,“हेच किरणबद्दलही लागू आहे. ती देखील एक उत्तम व्यक्ती आहे. आम्ही वैवाहिक नातं संपवलं, पण कुटुंब म्हणून अजूनही एकत्र आहोत. रीना, किरण, त्यांचे आई-वडील, माझे आई-वडील आपण सगळे आजही एकाच कुटुंबाचा भाग आहोत.”
गौरीने शांती आणि स्थैर्य दिलं
तो म्हणाला,“मला वाटलं होतं की आता मला कधीच योग्य पार्टनर मिळणार नाही. पण गौरी माझ्या आयुष्यात आली आणि तिने खूप शांती, स्थिरता आणि आनंद दिला. ती खरोखरच उत्कृष्ट व्यक्ती आहे. माझी लग्नं टिकली नसली, तरी रीना, किरण आणि आता गौरी या तिघींनीही मला माणूस म्हणून खूप काही दिलं आहे.”
‘महाभारत प्रोजेक्ट’ वर काय म्हणाला आमीर?
कामाबाबत बोलताना आमिरने त्याच्या जवळपास दशकापासून चर्चेत असलेल्या ‘महाभारत प्रोजेक्ट’वर मोठं अपडेट दिलं. त्याने सांगितलं की हे महाकाव्य पडद्यावर आणणं त्यांच्यासाठी फक्त एक चित्रपट बनवणं नाही, तर एक आध्यात्मिक आणि सर्जनशील प्रवास आहे.‘गेम चेंजर्स विद कोमल नाहटा’मध्ये तो म्हणाले की प्रोजेक्टची प्राथमिक तयारी सुरू आहे आणि पुढील दोन महिन्यांत स्क्रिप्टिंगलाही सुरुवात होऊ शकते. या भव्य प्रोजेक्टला यज्ञ असं म्हणाला.























