Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अश्विनी राजकारणात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. याबद्दल अश्विनी म्हणते,"मुळात मी मतदार आहे. मतदार हा राजकारणातील महत्त्वाचा घटक असतो".
अश्विनी महांगडे अभिनयासह समाजकार्यातही सक्रीय आहे. 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य' या संस्थेच्या माध्यमातून ती अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. आता राजकारणात येण्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना अभिनेत्री म्हणाली,"संधी मिळाली तर नक्कीच मी विचार करेन. कारण "आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, जे द्यायला हवे", हा 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य' या आमच्या सामाजिक संस्थेचा विचार आहे. मी आज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मला जसे जमेल तसे समाजासाठी काम करत आहे. आणि राजकारणामुळे मला माझा समाजाप्रती कामाचा आवाका वाढवता येणार असेल तर मला ते करायला नक्की आवडेल".
अश्विनी म्हणते,"मुळातच मी एक मतदार आहे आणि मतदार हा राजकारणातील सगळ्यात मोठा भाग मानला जातो त्यामुळे मीच काय कोणीही असे बोलत असेल की माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही तरी तो माणूस राजकारणात आहे. कारण तो एक मतदार आहे. त्यामुळे मी आधीपासूनच राजकारणात आहे".
लोकशाही टिकेल का? अश्विनी महांगडेचा सवाल
सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना (Ashwini Mahangade on Politics) अश्विनी म्हणाली,"सध्याचे राजकारण फार भयानक वाटतेय. प्रत्येक पक्षाचे त्याचे त्याचे असे विचार असतात आणि पक्ष त्याप्रमाणेच काम करत असतो. आता कोण कोणती विचारधारा स्वीकारतो, स्वीकारेल हेच समजेनासे झाले आहे. मला तरी एक मतदार म्हणून असे वाटतेय की आताचे जे राजकारणी आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. ही भीती नेमकी कसली आहे हे आपण वेगळे सांगायची गरज नाही. लोकशाही टिकेल का? हा प्रश्न माझ्या सारख्या अनेक तरुण तरुणींना पडत असेलच की".
लोकशाही टिकवायची तर समाजातील तरुण तरुणींनी पुढे येवून काम करायला हवं : अश्विनी महांगडे
अश्विनी महांगडे पुढे म्हणाली,"राजकारण वाईट आहे असं म्हणत बसलो तर ते तसेच राहील. त्यात उतरून काम केल्याशिवाय मार्ग नाही. लोकशाही टिकवायची तर समाजातील तरुण तरुणींनी पुढे येवून काम करायला हवे. राजकारणात संधी मिळाली तर शेतमालाविषयी, त्याच्या आयात निर्याती विषयी जी धोरणं आहे त्यात बदल करायला आवडेल, असे अनेक मुद्दे आहेत जे मला आता मतदार म्हणून खटकत आहेत आणि त्यावरच काम करायला हवं".
संबंधित बातम्या