नैनिताल : साचेबद्ध भूमिकांना शह देत काही अफलातून पात्र रुपेरी पडद्यावर जीवंत करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नीना गुप्ता यांच्याही नावाचा समावेश होतो. नीना गुप्ता यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीसोबतच त्या खासगी जीवनामुळं आणि त्यांच्या निर्णयामुळंही चर्चेत आल्या आहेत. सोशल मी़डियाच्या माध्यमातून चाहत्यांशी एक वेगळं नातं जपणाऱ्या कलाकारांपैकीच त्या एक. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


घर मे तो ऐसा ही होता है.... असं या व्हिडीओचं कॅप्शन असून, त्या नेमकं असं का म्हणत आहे याचा अंदाज व्हिडीओ पाहूनच येतो. नीना गुप्ता यांचं एक घर निसर्गाच्या सानिध्ध्यात, पर्वतांच्या कुशीत आहे. कोरोना संकटामुळं पहिल्या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी या घरात बराच काळ व्यतीत केला. ज्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा मुंबई, महाराष्ट्रात कडक संचारबंदी आणि लॉकडाऊनसदृश नियम लागू केले, त्यावेळीसुद्धा नीना गुप्ता यांनी त्यांचं मुक्तेश्वर येथील घर गाठलं. 


Marathi Serial Shooting : ब्रेक द चेनुमळे चित्रीकरण ठप्प, मराठी मालिकाही चित्रीत होणार राज्याबाहेर


आपण मुक्तेश्वरला आल्याचं त्यांनीच या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. ज्यानंतर पर्वत वगैरे सर्व काही ठिक आहे, पण कपडे वाळवण्यासाठी मी अशाच पद्धतीचा वापर करते असं सांगत त्यांनी बागेमध्ये दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जोपर्यंत घरात कुठे वॉशिंग मशिन दिसत नाही, कुठे एकादं कापड, टॉवेल वाळताना दिसत नाही, तोपर्यंत त्या घराला घरपणच नाही हा अगदी सुरेख आणि सर्वांनाच पटणारा विचार त्यांनी मांडला. 






आपल्या पतीला हे अनेकदा आवडत नाही, पण मला मात्र हे आवडतं असं म्हणत नीना गुप्ता यांनी त्यांता बाजू स्पष्ट केली. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात अशा आशयाच्या कमेंट केल्या. नीना गुप्ता यांचा हा अंदाज आणि घराला घरपण देण्यासाठी त्यांच्यालेखी नेमकं काय महत्त्वाचं आहे याबाबतची ही झलक पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित आलं आहे.