महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम जाहीर झाल्यानंतर तातडीने अनेक हिंदी मालिका शूटिंगसाठी परराज्यात गेल्या आहेत. यात जयपूर, गोवा, हैदराबाद आदी ठिकाणांचा समावेश आहे. काही हिंदी मालिकांनी उत्तर प्रदेशमधूनही रेड कारपेट अंथरल्याची चर्चा होती. नवा कंटेंट दाखवण्याची गरज लक्षात घेऊन अनेक मालिकांनी परराज्यात जाणं पसंत केलं आहे. हिंदी पाठोपाठ आता परराज्यवारीचं हे लोण मराठी टीव्हीविश्वातही आलं आहे. मराठी वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या अनेक वाहिन्या हैदराबाद, गोवा इथे शूटिंगसाठी पोहोचल्या आहेत.
हिंदीत असलेल्या सर्वच वाहिन्यांच्या मराठी उपवाहिन्याही आहेत. यात स्टारची स्टार प्रवाह, झीची झी मराठी, सोनीची सोनी मराठी, कलर्सची कलर्स मराठी अशा चॅनल्सचा समावेश होतो. हिंदीत सुरू असलेल्या अनेक मालिकांना या चॅनल्सनी वाढीव बजेट देऊन परराज्यात जाण्यास सुचवलं आहे. त्याप्रमाणे अनेक मालिका शूटिंगसाठी बाहेर गेल्याही. आता तोच कार्पोरेट नियम मराठीतही आला आहे. स्टारची मराठी वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहवरच्या काही मालिकाही आता हैदराबादला जाणार आहेत. तर काही मालिकांबद्दल गोव्यात बोलणी चालू आहेत. हैदराबादमध्ये रामोजी फिल्मसिटी हा त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं इंडस्ट्रीला वाटतं आहे.
रामोजीमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा मनोरंजनसृष्टीला एकाच ठिकाणी मिळतात. तिथे कलाकारांची राहायचीही सोय चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे बायोबबल तयार होण्यासाठी मदत होते. सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळे निर्मात्यांना आणि सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांनाही ते सोयीचं पडतं, हैदराबादमध्ये कोठारे व्हिजन्सच्या काही मालिका जाणार आहेत. कोठारे व्हिजनचे आदिनाथ कोठारे हे हैदराबादमध्ये दाखलही झाल्याचं वर्तुळात बोललं जात आहे.
हैदराबादप्रमाणे मालिकांच्या चित्रीकरणासाठी गोवा हा पर्यायही तपासला जातो आहे. सध्या इंडस्ट्रीत सुरू असलेल्या चर्चेनुसार स्वाभिमान, राजा राणीची ग जोडी अशा काही मालिका गोव्यात जायच्या विचारात आहेत. हिंदीपाठोपाठ मराठी मालिकाही परराज्यात जात असल्यामुळे सध्या सुरू असलेली त्यांची लोकेशन्स ओस पडली आहेत. नवा कंटेंट देणं क्रमप्राप्त असल्यामुळे चॅनल्स आणि निर्मात्यांनी हे पाऊल उचललं आहे.
झी मराठीनेही नव्याने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात रसिकांना नवा कोरा कंटेंट देण्याचं आश्वासन दिलं आहे. इतकंच नव्हे, तर 18 तारखेच्या रविवारी, या मालिका काही महाएपिसोड्सही देणार आहेत. त्यानंतर 19 तारखेपासून काही मालिकांचे नवे कोरे एपिसोड्स येणार असल्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे.
चॅनलकडून वाढीव बजेट
मालिकांना परराज्यात येणारा खर्च पाहता संबंधित चॅनल्सनी वाढीव बजेट देण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वसाधारणपणे एका एपिसोडसाठी चॅनलकडून देण्यात येणाऱ्या खर्चाइतकीच ती वाढीव रक्कम असल्याचं बोललं जातं. पण त्यावर अधिकृतरित्या कोणीच बोलायला तयार नाही.
बायोबबलच्या पर्यायावर विचार
टीव्ही मालिकेसाठी लागणाऱ्या सगळ्या कास्ट आणि क्रूची आवश्यक चाचणी करून त्यांना एकाच ठिकाणी ठेवणं, त्यांना सार्वजनिक स्थळापासून लांब ठेवणं, कास्ट क्रू वगळता तिसऱ्या नवख्या माणसाला चाचणीशिवाय त्यांच्यात मिसळू न देणं, त्यांच्या राहायची, खायची, प्रवासाची काळजी घेऊन व्यवस्था करून बायोबबल तयार केला जातो. त्याचा खर्च निर्माता किंवा चॅनल करतं. मालिकेच्या टीमचा बाहेरील कुणाशीही संबंध येणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यानंतर काम चालू होतं, त्याला बायोबबल म्हणतात. आयएफटीपीसी अर्थात इंडियन फिल्म अॅंड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स काऊन्सिल यांनी चॅनलला लिहिलेल्या पत्रातही बायोबबल ही संकल्पना जास्तीत जास्त राबवण्याचं सुचवलं आहे.
सध्या लागू झालेल्या संचारबंदीनंतर अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, विनाकारण बाहेर पडण्यास बंदी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक घरीच आहेत, त्यामुळे या मालिकांचे दर्शकही वाढण्याची शक्यता आहे. मालिकेचं चित्रीकरण बंद न करता, अशा प्रकारे आणखी नवा कंटेंट देणं या मालिकांना आणि संबंधित चॅनल्सला नक्कीच फायद्याचं ठरणार आहे.