IPL 2021 : मुंबईने हैदराबादचा 13 धावांनी पराभव केला आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 19.4 ओव्हरमध्ये 137 धावाच करता आल्या. हैदराबादचा हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. मुंबई हा सामना जिंकून गुणतालिकेत नंबर एकवर गेली आहे.
मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करत हैदराबादला 151 धावांचं आव्हान दिलं आहे. शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईला कर्णधार रोहित शर्मा आणि डी कॉकनं चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला अर्धशतकाचा टप्पा पार करुन दिला. मात्र रोहित स्थिरावला असे वाटत असतानाच 32 धावांवर विजय शंकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर आलेल्या सूर्यकुमारनं एक चौकार आणि एक षटकार ठोकला खरा मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो 10 धावांवर बाद झाला. यानंतर मुंबईच्या संघानं अत्यंत संथ खेळी केली. ईशान किशननं 21 चेंडूत 12 तर डीकॉकनं 39 चेंडूत 40 धावा केल्या. हार्दिक पांड्यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 7 धावांवर बाद झाला. शेवटी पोलार्डनं केलेल्या फटकेबाजीमुळं मुंबईला 150 धावा करता आल्या.
मुंबईने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. जॉनी बेअरस्टोने तर मुंबईच्या गोलंदाजांविरोधात जोरदार फटकेबाजी केली. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात तीन चौकार व षटकार खेचला. बेअरस्टोने तुफान फटकेबाजी केली मात्र आठव्या षटकात हिट विकेट झाला. त्याने 22 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.