मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील 168 रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालयांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वय अधिकारी 24x7 या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्या बाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही ऑक्सिजन पुरवठ्या संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.


मुंबई आणि महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार देताना ऑक्सिजन अर्थात ऑक्सिजन पुरविण्याची गरज स्वाभाविकच वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच कोविड आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन असलेले बेड्स उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन वितरण करताना शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जिथे ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था आहे, अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना बाधितांना स्थलांतरित करण्यात येत आहे, जेणेकरून कोणतीही अडचण उद्भवू नये. 


ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयातून मिळून 168 रुग्णांना काही खाजगी रुग्णालयांत तर काही कोरोना आरोग्य केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे.


सर्व मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ऑक्सिजन उपलब्धतेसह कोरोना बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :