मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्याचं आयुष्य आहे आणि तसा चित्रपट निघालाही. अनेक अडचणींचा सामना करुन संजय दत्त स्थिर झाला होता. त्यात आता एक दुख:द माहिती समोर आली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला.


दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्तची कोरोना टेस्टही करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र तब्येत ठीक नसल्याचं सांगून संजय दत्तने आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कर्करोग असल्याने संजय दत्तला उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता आहे.





प्रकृतीबाबत संजय दत्तचं ट्वीट केलं?
उपचारांसाठी कामातून ब्रेक असल्याचं ट्वीट अभिनेता संजय दत्तने केल्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचा दावा कोमल नाहता यांनी केला. दरम्यान आपल्या ट्वीटमध्ये संजय दत्तने म्हटलं आहे की, "प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी मी सध्या कामातून ब्रेक घेत आहे. मित्र परिवार आणि कुटुंब सोबत आहे, उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परत येईन."






दत्त कुटुंब आणि कॅन्सर
दत्त कुटुंब हे बॉलिवूड आणि राजकारणातील नावाजलेलं नाव आहे. मात्र कॅन्सरसारखा जीवघेणार आजार या कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही. कारण संजय दत्त यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं देखील कॅन्सरने निधन झालं होतं. 3 मे 1981 रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने नर्गिस दत्त यांचं निधन झालं. तर संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मालाही कॅन्सरने हिरावलं होतं. मेंदूच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.


संजय दत्तचे आगामी चित्रपट
'सडक 2' हा संजय दत्तचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये तो आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर कालच प्रदर्शित होणार होता, परंतु कदाचित संजय दत्तच्या प्रकृतीविषयीची वृत्त समोर आल्यामुळे ट्रेलर प्रदर्शिक केला नाही.


याशिवाय 'केजीफ पार्ट 2' मध्ये संजय दत्त यश या अभिनेत्यासोब झळकणार आहे. 'केजीएफ  चॅप्टर 2' मधील संजय दत्तचा लूकही समोर आला होता. यात संजय दत्तचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तसंच हेराफेरी 3 आणि कोची कोची होता है या सिनेमांमध्येही तो दिसणार आहे. दरम्यान याआधी ती आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याच्यासोब अर्जुन कपूर आणि कृती सेनन होती.


Sanjay Dutt diagnosed with lung cancer | अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर