मुंबई : शिवसेनेच्याभोवती अनेक अडचणींचा फास असताना दुसरीकडे पक्ष वाढवण्याचं कामही जोरदार सुरु झालं आहे. अहमदनगरमधील अपक्ष आमदार आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधलं.गेली अनेक वर्ष शंकरराव गडाख हे पवार कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात पण सत्ता स्थापनेच्यावेळी पदड्यामागचे कलाकार मिलिंद नार्वेकर यांनी गडाख यांना आपल्या गटात घेऊन पक्षाचं संख्याबळ वाढवलं.


मिलिंद नार्वेकरांची ही खेळी पक्षासाठी फायदेशीर ठरली आज त्याच शंकरराव गडाखांवर अहमदनगरमधील जबाबदारी देण्यात आली आहे. माजी आमदार व मंत्री अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली त्यासाठी हा तातडीनं पक्षप्रवेश घडवून आणला. अनिल राठोड हे 25 वर्ष अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. इतकेच नाही तर युतीच्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी अनिल राठोड यांचा सिंहाचा वाटा होता. अहमदनगरच्या राजकारणावर दबदबा असलेल्या अनिल राठोड यांची नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.


मिलिंद नार्वेकरांची खेळी


सुशांतसिंग राजपूत प्रकरण, कोरोनाचा विळखा, पक्षांतर्गत कुरघोड्या हे सगळं सुरु असताना मिलिंद नार्वेकर पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करताना दिसतात. कुठेही गाजावाजा न करता पक्षप्रमुखांप्रमाणेच शांत व संयमी राहून नार्वेकर पक्षवाढीच्या दिशेनं नेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नार्वेकर यांनी अजित पवारांच्या उपस्थित पक्षप्रवेश झालेल्या नगरसेवकांना पुन्हा पक्षात आणण्याचं काम केलं. एकामागोमाग नार्वेकरांच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे नार्वेकरांवर चांगलेच खुश असल्याचं कळतंय. पक्षात मंत्रीपद, महामंडळं, वरचढपणा, मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्याचा दिखावा यासगळ्या गोष्टी सुरु असताना नार्वेकर पक्षवाढीच्या भावनेनं काम करत आहे. शंकरराव गडाख हे अहमदनगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. गडाख कुटुंबियाचं सहकार क्षेत्रातलं योगदान मोठं आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. शिवसेनेला सहकार क्षेत्राशी जवळ असलेला आणि पवारांचे निकतवर्तीय वाढलेल्या गडाखांना शिवसेनेत आणून नार्वेकरांनी राष्ट्रवादीला धक्काच दिला आहे.


शिवसेना आमदारांची नाराजी


शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्वाची बैठक झूमद्वारे पार पडली. कोरोना लॉकडाऊन स्थानिक राजकारण या सगळ्या विषयांवर चर्चा सुरु होती त्यात काही आमदारांनी अर्थखातं राष्ट्रवादीकडे असल्यानं त्यांची कामं पटापट होतात. आपल्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याचं सूर आवळला. याआधीही महाविकास आघाडीमध्ये बदल्या, लॉकडाऊन, महत्वाचे निर्णय यावरून मतभेद असल्याचं दिसून आलं होतं. आता शिवसेनेच्याच आमदारांनी आपली कामं होत नसल्याचं सांगून पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे बोट दाखवलं आहे.