Bhushan Pradhan : 'कॉफी आणि बरंच काही', 'जुनं फर्निचर' या सिनेमातून अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) प्रेक्षकांच्या भेटीस आला. अल्पावधीतच भूषणने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलीत. तरुणींसाठी भूषण हा सध्या मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय झाला आहे. नुकताच भूषण महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात त्याने आयएएस अधिकारी अभय पाठक ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता तो लवकरच केतन घरत या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 26 जुलै रोजी त्याचा 'घरत गणपती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मागच्या काही वर्षातून भूषण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्येच त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील भूमिका साकारायला मिळाली. पण केतन घरत ही भूमिका त्याच्यासाठी एका प्रकारची स्वप्नपूर्तीच असल्याचं त्याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. घरत गणपतीच्या निमित्ताने भूषणने एबीपी माझासोबत संवाद साधला. 


इतकी वर्ष काम करतोय पण... - भूषण प्रधान


भूषणने या भूमिकेविषयी बोलताना म्हटलं की, इतकी वर्ष काम करतोय, पण असा सिनेमात कधी मिळाला नव्हता,ज्यामध्ये मी हिरो म्हणून दिसत आहे. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे झाले, त्या सिनेमांतील भूमिकांचं कौतुकही झालं. पण असा सिनेमा नव्हता मिळाला, ज्यात तुम्ही हिरो म्हणून इतकं चांगल्या पद्धतीने दाखवले जाता, हे आतापर्यंत झालं नव्हतं. नवज्योतने ज्या पद्धतीने या सिनेमातून मला दाखवलं आहे, ती एका प्रकारची स्वप्नपूर्तीच आहे.मी ह्यासाठी काम करत होतो असंही नव्हतं, पण हे प्रेक्षकांनाही हवं होतं.हे नवज्योतने पाहिलं आणि मला हा गोड रोल दिला. 


योग्य वेळी हा सिनेमा माझ्याकडे आला - भूषण


दरम्यान पुढे बोलताना भूषणने म्हटलं की, आतापर्यंत मालिका आणि सिनेमांमधून रोमँटीक रोल केले होते. पण त्यानंतर असा फॅमिली आणि  रोमँटीक जॉनर असलेला सिनेमा केला नव्हता. एका योग्य वेळी हा सिनेमा माझ्याकडे आला, जेव्हा वेगवेगळ्या भूमिका देखील सुरु आहेत.  खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे श्रीगणेशा झाला असं म्हणायलाही हरकत नाही. कारण मागच्या वर्षी हा सिनेमा मिळाला आणि त्यानंतर बरेच सिनेमे मिळाले, काही आलेत, काही यायाचे आहेत. 






तगडी स्टारकास्ट असलेला 'घरत गणपती'


निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर,  शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.  


ही बातमी वाचा : 


Marathi Movie :  सुप्रसिद्ध गायिकेवर झालेल्या ऍसिड अटॅकची गोष्ट 'मंगला' सिनेमातून प्रेक्षकांना करणार थक्क! कोणती अभिनेत्री दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत?