मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ वाढत आहे. जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. यात संशयाची सुई रिया चक्रवर्तीवर गेली आहे. बिहारमध्ये सुशांतसिंहच्या पालकांनी बिहार पोलिसांत रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला वेगळंच वळण मिळालं. पोलिसांचा तपास अद्याप पूर्ण झाला नसला तरी बिहारी लोकांचा मात्र भावनेचा कडेलोट झाला आहे. बिहारमधल्या काही स्थानिक गायकांनी आणि संगीतकारांनी थेट रियाला शिव्यांची लाखोली वाहणारी गाणी बनवली आहेत.


गाण्यातून यथेच्छ शिव्या घालण्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही. पण बिहारी जनतेने आपल्या मनातील उद्वेगाला अशी वाट करून दिली आहे. यू ट्युबवर रिया चक्रवर्ती भोजपुरी सॉंग्ज असं टाईप केलं की ही गाणी येतात. या गाण्यांच्या टेम्प्लेट्सच रियाला शिव्या घालणाऱ्या बनवण्यात आल्या आहेत. अशी किमान आठ ते दहा गाणी सध्या यू ट्युबवर पडली आहेत. यात बिहारचे स्थानिक गायक विकाश गोप, सुरज वेहाली आदी गायकांनी आणि संगीतकारांनी ही गाणी बनवली आहेत. अशा गाण्यांमध्ये रियाला यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आहे. शिवाय, या गाण्यांच्या कव्हरवर जो सुशांत भईया के फॅन है ओ ही इस गाना को सुने.. असं सूचित करण्यात आलं आहे.


अशा प्रकारच्या गाण्यांची खरंतर देशाला सवय नाही. पण सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर रियाभवती असलेलं संशयाचं धुकं दाट होऊ लागलं. अशाने सुशांतच्या चाहत्यांचा धीर सुटला आहे. रियाला त्यांनी दोषी ठरवून तिला अनेक असभ्य शिव्या घालायला सुरूवात केली आहे. सुशांत बिहारी लोकांच्या गळ्यातला ताईत होता. बिहार का बेटा होता तो. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्याचेच हे पडसाद आहेत, असं मत काही बिहारींनी व्यक्त केलं.


सुशांतचे फोटो यात वापरण्यात आले आहेत. त्याचे काही सिनेमातले फोटो आणि काही त्याच्या मरणानंतरचे फोटो या गाण्यात वापरण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार भारतीय संगीतासाठी नवा आहे.


महत्त्वाच्या बातम्या :