मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नविन माहिती समोर येत आहे. तसेच सुशांतचे काही जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सुशांतचा पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सुशांतच्या घराच्या या पुजेला रिया चक्रवर्ती उपस्थित नव्हती अशी माहिती पूजा करणाऱ्या पंडित गोविंद नारायण यांनी दिली आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील केपरी हाइट्स इमारतीतील 15 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रुद्राभिषेकची पूजा करण्यात आली होती. त्याच पूजेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्ती दिसत नाही. पंडित गोविंद नारायण शास्त्री यांनी सुशांतच्या या भाड्याने घेतलेल्या घराची पूजा केली होती. पंडित गोविंद नारायण शास्त्री म्हणाले, पुजेसाठी सुशांत सिंह राजपूत, त्यांची बहिण मीतू सिंह, बहिणीचे पती, कुटुंबातील काही सदस्य आणि सुशांतचा स्टाफ उपस्थित होता. या पुजेला रिया उपस्थित नव्हती. रुद्राभिषेकची पूजा तब्बल 4 तास सुरू होती. सुशांत चार तास फक्त पुजेला उपस्थित नव्हता तर सर्व विधी त्याने मनोभावे केले. ब्राह्मणांचे जेवण झाल्यानंतर पूजा संपेपर्यंत सुशांत उपस्थित होता. या पूजेसाठी 6-7 तास लागले.


"पूजेच्या वेळी सुशांत नैराश्यात आहे, असे वाटले नाही. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मोठा धक्का बसला", असे शास्त्री म्हणाले. तसेच या प्रकारणाचा सीबीआयने तपास करावा अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली.


शास्त्री म्हणाले, पूजेनंतर कधी सुशांत सिंह राजपूत यांनी इतर कोणत्या पूजेसाठी संपर्क केला नाही. रुद्राभिषेक पूजा ही घरात शांती, वैभव आणि धन लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते.


सुशांत सिंह राजपूत आणि त्याचं वडिलाचं पटत नव्हतं : संजय राऊत


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामानातून या प्रकरणार भूमिका मांडली आहे. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते, असे राऊत म्हणाले.