Arun Govil and Dipika Chikhlia : छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayan) या मालिकेने लोकांच्या मनावर केलेले गारुड आजही कायम आहे. सुमारे 30-35 वर्षांपूर्वी प्रसारीत झालेल्या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता कायम आहे. प्रभू श्रीराम आणि सीता माता या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या 'राम-सीते'च्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मुरारबाजी यांच्यावरील चित्रपटात ही जोडी दिसणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीचे स्वप्न पाहिले आणि पू्र्ण केले. स्वराज्याच्या उभारणीत अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.वीर मुरारबाजी यांनीदेखील पुरंदरच्या युद्धात आपले प्राण पणाला लावले. मुरारबाजींच्या या वीर संघर्षाची गोष्ट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटातून दिसणार आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटात अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया एकत्र काम करणार आहेत.
निर्माते अजय आरेकर यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध करणार आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बिग बजेट 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल यांची भूमिका
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बिग बजेट चित्रपट 'रामायण'मध्ये अरुण गोविल यांची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अरुण गोविल हे राजा दशरथाची भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा चित्रपटातील लूक व्हायरल झाला होता. अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखा आणि विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे.