Sai Pallavi fees for Ramayana and Net worth : फिल्म इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून एक समज पसरलेली आहे की, चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी अभिनेत्रीने थोडीशी तरी ग्लॅमरस असणं आवश्यक आहे. मात्र या गैरसमजाला छेद देण्याचं काम केलं अभिनेत्री साई पल्लवी हिने. साऊथ चित्रपटसृष्टीतून आपली कारकीर्द सुरू करणारी साई लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ती चाहत्यांची लाडकी बनलेली आहे.

साई पल्लवीला रश्मिका मंदाना आणि सामंथा रूथ प्रभू यांच्या तुलनेत अधिक पसंती का मिळते? ती अचानक इतकी प्रसिद्ध कशी झाली? तिची संपूर्ण कहाणी खाली वाचा.

साई पल्लवी कोण आहे?

साई पल्लवीच्या कारकीर्दीवर बोलण्याआधी, ती आहे तरी कोण हे समजून घेऊया. साईचा जन्म 9 मे 1992 रोजी झाला. 33 वर्षीय साई मूळची तमिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कोटागिरीची असून ती कोयंबटूरमध्ये वाढली. तिची धाकटी बहीण पूजा कनन ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साईने कोयंबटूरमधील अविला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

तिने 2016 मध्ये त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. 2020 मध्ये तिने ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा’ (FMGE) देखील दिली. मात्र, साईने भारतात वैद्यकीय प्रॅक्टिससाठी कधीही रजिस्ट्रेशन केलं नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचा अभिनयाशी दूर-दूरपर्यंत संबंध नव्हता आणि ती डॉक्टरच व्हायची इच्छा ठेवत होती.

ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सुरुवात

साई पल्लवीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लहानपणापासून नृत्याची आवड होती. शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती भाग घेत असे. तिने प्रभु देवा यांचं डान्स रिअॅलिटी शो ‘उंगलिल यार अदुथा’ आणि 2009 मध्ये ईटीव्हीवरील ‘धी अल्टीमेट डान्स शो’ मध्ये भाग घेतला होता, ज्यात ती फायनलिस्ट ठरली.

नृत्याच्या जगतात आपलं नाव कमावल्यानंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. सुरुवातीस तिला संघर्ष करावा लागला. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पल्लवी कस्तुरी मान’ आणि ‘धूम धाम’ या चित्रपटांमध्ये तिने ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं.

जेव्हा दिग्दर्शकाला स्टॉकर समजलं

2014 मध्ये साई पल्लवीला तिच्या करिअरचा पहिला मोठा ब्रेक मिळाला. दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन यांनी तिला ‘प्रेमम’ या चित्रपटासाठी ऑफर दिली. मात्र, सुरुवातीला साईने हा रोल नाकारला. अल्फोंस यांनी साईच्या डान्स रिअॅलिटी शोमधील क्लिप फेसबुकवर पाहिली होती आणि पहिल्याच नजरेत तिला आपल्यासाठी योग्य मानलं. तिने ऑफर नाकारल्यानंतरही अल्फोंस यांनी तिला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साईने त्यांना स्टॉकर समजलं! नंतर अल्फोंस यांनी आपली खरी ओळख सांगितल्यावर तिने चित्रपटासाठी होकार दिला आणि ‘प्रेमम’मध्ये मलरची भूमिका साकारली.

त्यानंतर तिने ‘काली’, ‘अथिरन’, ‘गार्गी’, ‘अमरन’ अशा अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला ‘अमरन’ प्रेक्षकांनी भरभरून पाहिला. साईने आतापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक नामांकित पुरस्कार पटकावले आहेत.

किती कोटींची आहे साई पल्लवीची संपत्ती?

सध्या ती साऊथ सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. The Siasat Daily च्या रिपोर्ट्सनुसार, 2025 मध्ये साई पल्लवीची एकूण संपत्ती 45 ते 50 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

ती एका चित्रपटासाठी 2.5 ते 3 कोटी रुपये मानधन घेते. मात्र, नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’साठी तिने आपले मानधन 6  कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे चित्रपटांच्या दोन भागांसाठी तिला 12 कोटी रुपये मिळणार आहेत. ती हे उत्पन्न चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमवते. पण एकदा तिने 2 कोटींचं फेअरनेस क्रीम ब्रँड प्रमोशन नाकारलं होतं.

चाहत्यांची लाडकी ‘सीता’

सोशल मीडियावर साई पल्लवीला ‘रामायण’मधील ‘सीता’च्या भूमिकेसाठी कास्ट केल्याबद्दल दिग्दर्शक नितेश तिवारी यांचं लोक कौतुक करत आहेत. यामागील कारण म्हणजे तिची साधेपणा. अनेक इंस्टाग्राम रील्समध्ये जेव्हा इतर अभिनेत्री स्टायलिश लुकमध्ये अवॉर्ड स्वीकारताना दिसतात, तेव्हा साई पल्लवी अगदी साधेपणात मंचावर झळकते. तिचा हा साधेपणाच तिच्या चाहत्यांना भुरळ पाडतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jayam मधील गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री आता कशी दिसते? सौंदर्य आजही भुरळ पाडेल, सिनेसृष्टीपासून दूर का गेली?