Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Adinath Kothare in Ramayana: आदिनाथ कोठारेने शेअर केला ‘रामायण’च्या सेटवरील खास किस्सा!

Adinath Kothare on Ramayana: अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) सध्या नमित मल्होत्रा (Namit Malotra) यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटातील भरतच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकतीच आदिनाथने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटातील महत्त्वपूर्ण ‘भरत मिलाप’ प्रसंगाच्या शूटिंगदरम्यानचे अनुभव सांगितले आहेत. ‘भरत मिलाप – अॅनॅटॉमी ऑफ अ सीन’ या शीर्षकाखाली त्याने शेअर केलेल्या या पोस्टमधून या प्रसंगामागची तयारी, मनातील दडपण आणि सेटवरील काही खास आठवणी उलगडल्या आहेत.
या पोस्टमध्ये आदिनाथने सांगितले की, संपूर्ण शूटिंगदरम्यान तो ‘भरत मिलाप’ या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होता. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कथा कथनाच्या शैलीचा तो नेहमीच चाहता राहिला आहे. विशेषतः ‘दंगल’ हा चित्रपट त्याच्या पिढीसाठी पटकथालेखनाचा एक आदर्श असल्याचेही त्याने नमूद केले. मात्र, अनेक दिग्गज कलाकारांनी यापूर्वी साकारलेल्या भरतसारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेला आपण कसा न्याय देणार, याचे दडपणही त्याच्या मनात होते.
शूटिंगपूर्वी रिहर्सलदरम्यान नितेश तिवारी यांनी केलेल्या एका छोट्याशा संवादाने आदिनाथचे हे दडपण दूर झाले. आदिनाथच्या ऑडिशनची आठवण करून देत नितेश सरांनी त्याच्या अभिनयातील प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि भरतच्या व्यक्तिरेखेसाठी नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांच्या या शब्दांमुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे आणि मनातील अनावश्यक विचार दूर झाल्याचे आदिनाथने सांगितले.
यासोबतच चित्तरकूटच्या भव्य सेटवरील अनुभवही त्याने शेअर केला. श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने संपूर्ण सेटवर एक वेगळीच दैवी ऊर्जा जाणवत होती, असे त्याने नमूद केले. तसेच, भरतच्या मुकुटाच्या फिटिंगसाठी निर्माता नमित मल्होत्रा स्वतः सेटवर उपस्थित होते. नितेश तिवारी यांची दृष्टी पडद्यावर अचूकपणे उतरावी, यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत ते मुकुट व्यवस्थित बसेपर्यंत तिथेच थांबले होते, अशी खास आठवणही आदिनाथने सांगितली.
आपला संपूर्ण अनुभव शेअर करत आदिनाथने लिहिले आहे (Adinath Kothare Shares His Experience of Shooting the Bharat Milap Scene)
View this post on Instagram
‘भरत मिलाप’ – एका प्रसंगाची जडणघडण :
'संपूर्ण शूटिंगदरम्यान मी एका विशिष्ट प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होतो. माझ्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ती संधी होती.
तोपर्यंत मी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या मागे राहून, त्यांची काम करण्याची पद्धत जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. चित्रपटाचा आवाका प्रचंड होता, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा कधीच ढळला नाही. जवळपास दशकभर एखादं विश्व विटा-विटांनी उभं केल्यानंतरच अशी स्थिरता येते. त्यांच्या कथाकथनाच्या शैलीचा मी नेहमीच चाहता राहिलो आहे. ‘दंगल’ हा आमच्या पिढीसाठी पटकथालेखनाचा एक आदर्शच आहे. त्यामुळे ‘भरत मिलाप’च्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची मला प्रचंड उत्सुकता होती. मी स्वभावाने अस्वस्थ आणि प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असलेला माणूस आहे.
कलाकार म्हणून आपण एखादा प्रसंग कसा साकारायचा, याच्या अनेक कल्पना मनात तयार करत असतो. अनेकदा स्वतःकडून खूप अपेक्षाही ठेवतो. ‘भरत मिलाप’ हा प्रसंग अनेक पिढ्यांमधील दिग्गज कलाकारांनी साकारला आहे. मग मी त्यांच्या तोडीस तोड कसा ठरेन? हा विचार मनात कुठेतरी दडपण निर्माण करत होता आणि मला हे सगळं बाजूला ठेवणं गरजेचं होतं, याची जाणीव झाली.
शूटिंगपूर्वी कॉस्च्युम टीमने भरतचा मुकुट आणला. त्यात काही बदल करायचे असल्यामुळे तो पुन्हा नेण्यात आला.
मला आता थांबवत नव्हतं. त्यामुळे मी रिहर्सलसाठी थेट दिग्दर्शकांच्या व्हॅनिटीच्या दिशेने गेलो. नितेश सरांनी अतिशय आपुलकीने माझं स्वागत केलं आणि त्यामुळे माझ्या मनात सुरू असलेला विचारांचा गोंधळ क्षणात कमी झाला. आम्ही दोघेही स्क्रिप्ट घेऊन समोरासमोर बसलो. पहिल्याच प्रयत्नात माझे संवाद अचूक व्हावेत, अशी माझी अपेक्षा होती. मनात कुठेतरी त्यांच्या कौतुकाची आणि खात्रीची अपेक्षाही होती. आणि मग त्या जादूगाराने आपली जादू दाखवली.
मी वाचन सुरू करण्यापूर्वी नितेश सरांनी भरतच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, “मला तुझी टेस्ट आठवते. तू खूप प्रामाणिक होतास. भरतसाठी नेमकी हीच गोष्ट आवश्यक आहे.” त्यांनी हे सांगण्याची गरजही नव्हती, पण मला नेमकं काय ऐकण्याची गरज आहे, हे त्यांना माहीत होतं. हीच नितेश तिवारी यांची काम करण्याची पद्धत आहे – समोरच्या व्यक्तीला समजून घेणं आणि त्याच्याप्रती सहानुभूती ठेवणं.
माझ्या मनावरील सगळं दडपण दूर झालं. मी चित्तरकूटच्या सेटवर पोहोचलो, तेव्हा माझ्यासमोर जणू प्रत्यक्ष दिव्यत्वच अवतरलं होतं श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या उपस्थितीने ‘रामायण’चा संपूर्ण सेट एका दैवी ऊर्जेने भारून गेला होता.
शेवटच्या तयारीसाठी मी माझ्या मार्कवर उभा असताना, कॉस्च्युम टीम सुधारणा केलेला मुकुट घेऊन आली. त्यांच्यासोबत निर्माते नमित मल्होत्राही स्वतः उपस्थित होते. नितेश सरांची दृष्टी जशीच्या तशी पडद्यावर उतरावी, यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत ते मुकुट व्यवस्थित बसेपर्यंत तिथेच थांबले. यावेळी मुकुट अगदी योग्य बसला होता. नितेश सरांनी माझा दृष्टिकोन योग्य दिशेने वळवला आणि कदाचित त्याच वेळी भगवान भरतासाठी मुकुटही योग्य जागी बसला असावा!'.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















