Hindi Language Controversy : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यातील ट्विटर वॉर सध्या चांगलेच चर्चेत आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये जोरदार तूतू-मैंमैं झाली होती. अगदी नेटकरीदेखील प्रतिक्रियांच्या माध्यमातून या वादात सामील झाले होते. मात्र, आता ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने या वादात उडी घेतली आहे. कंगनाने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला अभिनेत्री मागे राहत नाही. नुकताच कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात कंगनाने ‘हिंदी’ भाषेच्या या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाली कंगना?
या वादावर एबीपीला प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, ‘या प्रकरणावर माझ्याकडे थेट उत्तर नाही. आपला देश विविधतेने, विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी बनलेला आहे. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे. मात्र, आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक धागा हवा आहे. संविधानाचा आदर करायचा असेल, तर हा आपल्या राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषा केली आहे. मात्र, तमिळ हिंदीपेक्षा जुनी आहे आणि संस्कृत तर त्याहून जुनी आहे. मला असे वाटते आपली राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे. कारण, कन्नड, तमिळ, गुजराती ते हिंदी सर्व भाषा संस्कृतमधून आल्या आहेत.
आता संस्कृत सोडून, हिंदी का बनवली गेली याचे उत्तर माझ्याकडे नाही. हे त्यावेळी घेतलेले निर्णय आहेत. पण जेव्हा खलिस्तानची मागणी होते, तेव्हा ते म्हणतात की आमचा हिंदीवर विश्वास नाही. तरुणांची दिशाभूल करत असताना, ते संविधान नाकारत आहेत. वेगळे राष्ट्र व्हावे यासाठी तमिळांचे आंदोलनही झाले. तुम्ही बंगाल वेगळा अक्र्ण्याची मागणी करता आणि तुम्ही हिंदीला ओळखत नाही असे म्हणता. मग, तुम्ही हिंदी नाकारत नसून, दिल्लीला सत्तेचे केंद्र म्हणून नाकारत आहात. या गोष्टीला अनेक बाजू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींची कल्पना यायला हवी.
जेव्हा तुम्ही हिंदी नाकारता, तेव्हा तुम्ही दिल्लीच्या सरकार आणि आपले संविधानही नाकारता. तुमचा सरकारवर विश्वास नाही, मग ते सर्वोच्च न्यायालय असो, कोणत्याही प्रकारचे कायदा असो... दिल्लीत सरकार जे काही करते, ते हिंदीत करते, नाही का? जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश असो, त्यांना त्यांच्या भाषांचा अभिमान वाटतो. वसाहतीचा इतिहास कितीही काळा असला, तरी सुदैवाने आणि दुर्दैवाने इंग्रजी हा संवादाचा दुवा बनला आहे. इंग्रजी ही एकात्म भाषा असावी का? की हिंदी, संस्कृत किंवा तमिळ ही जोडणारी भाषा असावी? हे आपण ठरवायचे आहे.’
साऊथचे चित्रपट इतके यशस्वी का?
या प्रश्नावर उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘आम्ही आमचे चित्रपट तामिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये डब करतो. आम्ही आमचे चित्रपट देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जात आहोत. दाक्षिणात्य आणि उत्तर किंवा दक्षिण भारतातील चित्रपटांमधला वाद हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना नेहमीच सावत्र आईची वागणूक मिळाली आणि त्यामुळेच आज त्यांना विजयी झाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्यावर असा अन्याय व्हायला नको होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दक्षिण भारतातील एकही आघाडीचा नायक नाही... मी एका अतिशय यशस्वी नायकाबद्दल बोलत आहे.’
‘मी नेहमीच हा मुद्दा मांडत आलो आहे की, इथले वर्तुळ खूप लहान आहे. बाहेरच्या लोकांना कसे आत येऊ दिले जात नाही, याचेही हे उदाहरण आहे. आता ते त्यांचे हक्क व्यक्त करत आहेत, जे त्यांच्याकडे आधीच आहेत... हा त्यांचा देश आहे... म्हणून ते त्यांचे हक्क मागत आहेत. हा संपूर्ण देश त्यांचाही आहे. आपण सगळे भारतीय आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. जे इथे सर्वेसर्वा म्हणून बसले आहेत, त्यांच्या तोंडावर ही एक मोठी चपराक आहे. मला खूप आनंद होतोय की, त्यांना त्यांचे हक्क मिळत आहेत’, असे कंगना म्हणाली.
हेही वाचा :