मुंबई: आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


राज ठाकरे औरंगाबादसाठी रवाना, येत्या 48 तासात ‘राज’गर्जना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबादच्या सभेचा आढावा घेतला. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी  होणार असून त्यासाठी 100 ते 200 गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थित हा विधी होणारल आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. आयुक्तालयात कार्यालयात राज ठाकरेंच्या सभा स्थळाच्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस असणार असल्याने पोलीस आयुक्त सभेवर लक्ष ठेवून असणार आहेत. 


राज ठाकरे औरंगाबादला जाताना वाटेत छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.  तसेच राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला जाताना नगर जिल्ह्यातील नेवासा इथे त्यांचं स्वागत होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते नेवासा फाट्याहून राज ठाकरेंसोबत औरंगाबादला रवाना होतील.   
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत बैठक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. खासदार, प्रवक्त्यांच्या बैठकीनंतर आज सर्व जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलवली आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे ऑनलाईनच्या माध्यमातून  जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
 
वंचित बहुजन आघाडीकडून 'शांती मार्च'चे आयोजन, पोलिसांकडे परवानगी मागितली
 राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच वंचितचा शांती मार्च आहे. याला आता पोलीस परवानगी देणार का नाही हे आज समजेल. वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादमध्ये 'शांती मार्च' काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता क्रांती चौक ते भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणापासून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जाणार असून या मार्चला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 
 
महाविकास आघाडीची आज निर्धार सभा
राज्यातील राजकीय परिस्थितीत सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी महाविकास आघाडीकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा पुण्यातील अलका चौकात संध्याकाळी होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
 
राणा दांम्पत्याच्या जामीनावर आज फैसला होणार 
राणा दापंत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंबंधित जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 केसेस आहे तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्य बाहेर पडल्यावर पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. 


अजित पवार सोलापूर दौऱ्यावर 
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील अनगर नगरपंचायत निर्मिती बद्दल शेतकरी मेळावा घेण्यात आला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या गावात हा मेळावा होतोय. सकाळी 10 वाजता होणाऱ्या मेळाव्यास अजित पवार उपस्थित राहतील.


लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे निवृत्त होणार
लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे आज निवृत्त होणार आहेत. ते सकाळी 9 वाजता नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर ते 9.30 वाजता गार्ड ऑफ ऑनर स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते जनरल मनोज पांडे यांच्याकडे पदभार देतील


या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आज
ज्योतिषशास्त्रात शनिचारी अमावस्येच्या दिवशी, 2022 मधील पहिले सूर्यग्रहण ही एक मोठी खगोलीय घटना मानली जाते. हिंदू कॅलेंडर आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे सूर्यग्रहण आंशिक असेल आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही. मात्र, सूर्यग्रहण आणि शनिचरी अमावस्या एकाच दिवशी असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम होणार आहे.


आज आयपीएलच्या मैदानात डबर हेडर
आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता आरसीबी आणि गुजरात यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसरा सामना हा मुंबई आणि राजस्थानमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.