Abhijeet Kelkar : एखादा ट्रक उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झाला..., घोडबंदर रोडवर ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या अभिनेत्याची संतापजनक पोस्ट
Abhijeet Kelkar : अभिनेता अभिजीत केळकर याने घोडबंदर रोडवर ट्रॅफीकमध्ये अडकल्यानंतर संतप्त पोस्ट केली होती.
Abhijeet Kelkar : अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) हा अनेक समस्यांवर सोशल मीडियावर भाष्य करत असतो. काही दिवसांपूर्वीच अभिजीतने घोडबंदर रोड परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर भाष्य केलं होतं. पण आता नुकतच अभिजीत शुटींगला जाताना त्याला वाहतूक कोडींचा सामना करावा लागला. त्यावर अभिजीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अभिजीत केळकरने नुकतच झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत एन्ट्री केली आहे. शुटींगसाठी सकाळी 7.30 वाजता घरातून निघाला तरीही अभिजीतला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे अभिजीतने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत या स्थितीवर भाष्य केलं आहे.
अभिजीतची पोस्ट नेमकी काय?
अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरातून गुगल मॅप बघून निघालेलो. गेल्या दीड तासांपासून घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो. ट्राफीक कधी सुटणार, शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहीत नाही, ह्या केऑटिक सिच्युएशनमध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, "अभिनेता" अभिजीत केळकर असा न करता "चांद्र मोहीमवीर" अभिजीत केळकर असा करावा ही विनंती...'
अभिजीतने रस्त्यांच्या समस्यांवर केलं होतं भाष्य
अभिजीतने याच परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर भाष्य करताना म्हटलं की, 'ठाण्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि बारा महिने, चोवीस तास रहदारीचा असलेला घोडबंदर रोड. गेली अनेक वर्ष, त्यावरील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामामुळे चर्चेत असतो...दोन्ही बाजूच्या गाड्या, heavy ट्रक्स, ट्रॉलर्स रोज येऊन घाटात अडतातच, त्यात इथे स्ट्रीट लाइट्सही नाहीत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात, त्यामुळे वाहनं अडतात ते वेगळंच... रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो... मी ही काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी, बाईक accident मधे, मरता मरता वाचलो होतो पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही... निवडणुका आल्या-गेल्या, येतील-जातील, तसेच जीवही गेले, जातील आणि अंतरालातला हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील.'