Aastad Kale : राज्यात लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षाकडून प्रचार सभांचा धडाका सुरु झाला. त्यातच अनेक कार्यक्रमांसाठी राजकीय पक्षांकडून नाट्यगृहांची निवड करण्यात येते. सध्या अनेक कार्यक्रम नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा फटका मराठी नाटकांच्या प्रयोगाला बसत असल्याचं चित्र आहे. त्यावर आता एका मराठी अभिनेत्याने भाष्य केलं आहे. अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याचं मास्टर माईंड हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आस्तादने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
आस्तादने नुकतच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचा नाटकांवर परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मराठी नाटकांना सध्या नाट्यगृहासाठी वाट पाहावी लागत असल्याचं चित्र आहे. यावर आस्तादने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. विजय केंकरे दिग्दर्शित मास्टर माईंड हे नाटक सध्या खूप गाजतंय.
नाटकाला फटका बसतोय का?
लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांचा वापर केला जातो. याचा नाटकाला फटका बसतोय का? या प्रश्नाचं उत्तर देताना आस्तादनं म्हटलं की, होय काही दिवसांपूर्वीच याचा नाटकाला फटका बसला. निवडणूक आयोगाने तारीख काढून घेतल्याने पुण्यातील दोन प्रयोग रद्द करावे लागले. पण हे होतच राहणार. शेवटी निवडणूक हा लोकशाहीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि आपण या लोकशाहीचा भाग आहोत, त्यामुळे या गोष्टींचा राग कोणीही मानू नये, असं आस्तादनं म्हटलं.
आस्ताद हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही कायम चर्चेत असतो. तसेच अनेकदा तो त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ट्रोल देखील होतो. पण अनेक मुद्द्यांवर आस्ताद त्याचं परखड मत मांडत असतो. यावरही आस्तादने भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, मी कोणत्याही कंपूचा भाग नाही, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो. पण लोकांचा परखड आणि उर्मट या शब्दांमध्ये गोंधळ होतो. लोकांना स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नाहीत आणि मला गोडगोड बोलता येत नाही, असं आस्तादनं म्हटलं.