Marathi Serial Update : सध्या कलर्स मराठी, स्टार प्रवाह या वाहिन्यांवर सध्या नव्या मालिकांचा सिलसिला सुरु आहे. त्यातच आता झी मराठीहीने (Zee Marathi) त्यांचा पुढचा डाव टाकलाय. स्टार प्रवाह वाहिनीवर शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत असलेली थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून शिवानी तब्बल 9 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे. त्यातच कलर्स मराठीवरही अबीर गुलाल आणि अंतरपाट या दोन मालिका सुरु होणार आहेत. त्यातच आता झी मराठीहीने त्यांच्या पुन्हा एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे. 


मराठी टेलिव्हिजन इन्फो या पेजवरुन या मालिकेचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या दोन नव्या मालिका सुरु झाल्यात. त्यानंतर आता पुन्हा एक नवी मालिका झीवर सुरु होणार आहे. दरम्यान या नव्या मालिकेच्या पोस्टरमध्ये एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणी दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बहिण भावाची गोष्ट छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. 


मालिकेतील कलाकार अद्यापही गुलदस्त्यात


दरम्यान या मालिकेत कोणते कलाकार दिसणार हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोणते नवे कलाकार छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान ही मालिका झी तमिळ वाहिनीवरील एका 'अण्णा' मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच तमिळवरील ही मालिका देखील झी तेलुगू वाहिनीवरील 'मा अण्णाया' या मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत होतं. 


पुन्हा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला


झी मराठीवर सुरुवातीला पारु आणि शिवा या दोन नव्या मालिका सुरु झाल्या. त्यानंतर नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे, या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. त्यातच झी मराठीने  ‘जगद्धात्री’ या नव्या मालिकेची देखील घोषणा केली. झी बांगलावरील मालिकेचा ही मालिका रिमेक असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक रिमेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं चित्र आहे. 


कोणती मालिका घेणार प्रेक्षकांच्या निरोप?


झी मराठी वाहिनीवर मागील अनेक महिन्यांमध्ये अनेक मालिका आल्या आणि अल्पावधीतच या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. चंद्रविलास, ती परत आलीये, घेतला वसा टाकू नको, अशा अनेक मालिका आल्या आणि अगदी काही महिन्यांतच ऑफ एअरही गेल्या. त्यामुळे सध्या झी कडून टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं चित्र आहेत. त्यातच सध्या वाहिनीवर रिमेक मालिका होत असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या नव्या मालिकेमुळे कोणती मालिका ऑफ एअर जाणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.




ही बातमी वाचा : 


Actress Photo Leak : समंथानंतर आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचे प्रायव्हेट फोटो लीक, सोशल मीडियावर गदारोळ; चाहत्यांकडून कठोर कारवाईची मागणी