मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्या 19 ऑक्टोबरला दिल्लीवारी करत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प३यत्न केला. दरम्यान, एकीकडे जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण होत असताना दुसरीकडे नेतेमंडळी तिकीट मिळवण्यासाठी सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. उमेदवारीसाठी नेतेमंडळी त्या-त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अजितदादा यांच्या पक्षाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 


बबन शिंदेंना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी हवी


अजित पवार यांच्या पक्षाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी आज (20 ऑक्टोबर) शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार बबन शिंदे यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी हवी आहे. त्यासाठी शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


बबन शिंदे मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?


बबन शिंदे यांचे माढा मतदारसंघात मोठे राजकीय वर्चस्व आहे. त्यांनी सलग सहा वेळा माढ्यातून विजय मिळवलेला आहे. मात्र गेल्या कही दिवसांपासून ते आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मुलाला तिकीट न मिळाल्यास त्याला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बबन शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? त्यांच्यात नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली? असे विचारले जात आहे.


राधानगरीतूनही अजित पवार यांना धक्का? 


तिकडे कोल्हापुरातही वेगळे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. येथे अजित पवार यांच्या पक्षाचे कोल्हापुरातील राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे.  राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ही भेट झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये राधानगरी हा मतदारसंघ ठाकरेंच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पाटील यांनी राऊत यांची भेट घेतली आहे. राधानगरी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व सध्या प्रकाश आबिटकर हे करतात. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळेच उमेदवारीची शाश्वती मिळाल्यास के पी पाटील हे अजित पवार यांची साथ सोडून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा :


छगन भुजबळांना घरातूनच धक्का? पुतणे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात, नांदगावमधूनच लढण्यास इच्छुक, सुत्रांची माहिती


जर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; 'या' नेत्यानं दंड थोपटले


मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!