Mahim Assembly Constituency: मुंबई : जर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या (Mahim Assembly Constituency) रिंगणात उतरणार असतील तर, मीसुद्धा माहिममधून महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aaghadi) आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलं आहे. तसेच, पुढे बोलताना माहिममधून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहितीही सचिन खरात यांनी दिली आहे. दरम्यान, सचिन खरात यांनी थेट अमित ठाकरेंविरोधात दंड ठोपटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  


मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवाराला आमचा विरोध असणार आहे. त्यामुळेच जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी स्वतः माहीम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे इच्छुक आहे, तशी मागणी आमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे मी करणार आहे.


सचिन खरात बोलताना म्हणाले की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला आमचा विरोध असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. तसेच, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर, याच मतदारसंघातून अमित ठाकरेंविरोधात मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे." 


अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित ठाकरेंसाठी दोन जागांची चाचपणी सुरू आहे. सध्या त्यांनी दोनपैकी कोणत्या जागेवर निवडणूक लढवायची याबाबत विचारमंथन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील माहीम आणि भांडुप पश्चिम विधानसभा जागांचा आढावा घेतला जात आहे. शिंदे गटाचे सदा सरवणकर हे माहीममधून विद्यमान आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.